राज्यातील वस्त्यांना जातिवाचक नावे देण्याची प्रथा हद्दपार करून वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. या निर्णयाची समाज कल्याण विभागाने विविध यंत्रणाशी समन्वय साधून यशस्वी अंमलबजावणी केली असल्याने नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील ४६३ पैकी ३९१ वस्त्यांची जातिवाचक नावे हद्दपार झाली आहेत.
नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांतील सर्वच जातिवाचक नावे बदलण्यात आलेली आहेत. वंचित दुर्बल घटकांचा विकास करणे व त्यांना सामाजिक प्रवाहात आणणे हे ध्येय ठेवून सामाजिक न्याय विभाग सातत्याने कार्यरत आहे. जातीय सलोखा निर्माण करण्यात सामाजिक न्याय विभागाचे फार मोठे योगदान आहे.
सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला. राज्यात विविध शहरांत व ग्रामीण भागात काही वस्त्यांना जातिवाचक नावे देण्यात आली आहेत. ज्यात महारवाडा, मांगवाडा, ब्राह्मणवाडा अशी जातिवचक नावे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नाहीत. ही बाब विचारात घेऊन राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून त्या वस्त्यांना विविध महापुरुषांची किंवा तत्सम नावे उदा. समता नगर, भीमनगर, ज्योतिनगर, क्रांतीनगर या प्रकारची नावे देण्याबाबतची कार्यवाही सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आली आहे.
सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व शहरे व ग्रामीण भागांत वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून त्या वस्त्यांना महापुरुष किंवा तत्सम नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा – नागपूर – पोलीस शिपाई रायफल उभी ठेवून स्वच्छ करीत होता, अचानक…
चंद्रपूर जिल्ह्यात कार्यवाही संथगतीने
नागपूर विभागात शहर व ग्रामीण भागातील एकूण २३२ जातिवाचक वस्त्यांचे, रस्त्यांची नावे बदलण्यात आली असून त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील ७३ नावे, नगरपालिका क्षेत्रातील ४७ नावे व ग्रामीण भागातील ११२ नावे बदलण्यात आली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ९० पैकी केवळ १५ नावेच बदलण्यात आली आहेत. यामध्ये चंद्रपूर महापालिकेमध्ये ९ जातिवाचक नावे असून एकही नाव अद्यापही बदलण्यात आलेली नाही. चंद्रपूर नगरपालिका विभागात १६ पैकी, तर ग्रामविकास विभागामध्ये ६५ पैकी केवळ ३ जातिवाचक नावेच बदलण्यात आलेली आहे. यावरून चंद्रपूर जिल्ह्यात जातिवाचक नावे बदलण्याची कार्यवाही संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते.