भंडारा : निवडणूक जातीच्या गणितांवर होऊ नये, असे कितीही म्हटले जात असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत जातकारण येतेच. याबाबत भंडारा-गोंदिया मतदारसंघ अधिक संवेदनशील आहे. या मतदारसंघात कुणबी, पोवार, तेली आणि अनुसूचित जातीचा प्रभाव असून विकासाच्या नाही तरी जातीच्या आधारावर येथील निवडणुकीची समिकरणे जुळविली जातात. त्यामुळे महायुती असो की महाविकास आघाडी या मतदार संघात उमेदवार देताना जातीचे प्राबल्य आणि समाजाचा कल बघून उमेदवार द्यावा लागतो. नेमके आताही पक्ष उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत असताना या मतदार संघात “जातकारण” चांगलेच तापले असून तेली आणि पोवार समाजाच्या नेत्यांनी आणि मतदारांनी “पक्षाच्या नाही तर आमच्या समाजाच्या किंवा जातीच्या उमेदवारालाच निवडून देऊ” असा आक्रमक पवित्राच घेतलाय. दोन दिवसांपूर्वी गोंदियात पोवार समाजाने मोर्चा काढून निर्वाणीचा इशारा दिला आहे तर काल भंडाऱ्यात तेली समाजाच्या मेळाव्यात तेली उमेदवार दिला नाही तर त्या राजकीय पक्षाचे काही खरे नाही असा एकसूर तेली समाजाच्या सर्व नेत्यांनी काढला. त्यामुळे आता युती आणि आघाडीचे पक्षश्रेष्ठी उमेदवार जाहीर करताना कोणत्या समाजाकडे झुकते माप देईल आणि कोणत्या जातीच्या दबावाला बळी पडेल ? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सन २०२४ मध्ये भंडारा जिल्ह्यातील भंडारा – पवनी , साकोली-लाखांदूर-लाखनी आणि तुमसर – मोहाडी अशा तीन विधानसभा मतदारसंघात एकूण ९ लाख ९२ हजार १२० मतदार असून गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा – गोरेगाव, सडक अर्जुनी – अर्जुनी मोरगाव या विधानसभा क्षेत्रात ८ लाख २४ हजार ४८७ अशी मतदारांची संख्या आहे. अर्थात भंडारा गोंदिया मतदारसंघात एकूण १८ लाख १६ हजार ६०७ अशी मतदारांची संख्या आहे. आता जर जातीय आधारावर विभागणी केली तर सध्या भंडारा गोंदियात सव्वा चार लाख कुणबी मतदार असल्याचे कुणबी समाजाच्या नेत्याकडून सांगण्यात येत आहे. तर तीन ते साडे तीन लाख पोवार मतदार असल्याचा दावा पोवार समाजाने केला आहे.

हेही वाचा…नागपूर: भाजयुमोच्या नमो संमेलनाविरोधात आंदोलन; पोलिसांकडून लाठीमार, अनेकांना अटक

त्यातच तीन लाखाच्या घरात तेली मतदार असल्याची आकडेवारी तेली समाजाचे नेते यांनी दिली असून कुणब्यांच्या खालोखाल तेली समाजाचे मतदार असून पोवार उगाच आकडा फुगवून सांगत असल्याचा आरोपही आता तेली समाजाकडून होत आहे. उर्वरित इतर व अनुसूचित जातीचे मतदार असल्याचे सांगितले जाते. या आकडेवारीनुसार जातीय गणितं जुळवून आता पक्षाला उमेदवाराची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे आता उमेदवार कोणत्या पक्षाचा यापेक्षा तो कोणत्या जातीचा यावर भर देण्यात येईल अशी चर्चा आहे. भाजप मात्र बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाच्या उमेदवारालाच प्राधान्य देईल हे जवळपास निश्चितच आहे. त्यातही “बाहेरचे नकोच” असाच सूर जिल्ह्यातील मतदारांतून निघत असल्याने स्थानिक कुणबी उमेदवाराला उमेदवारी दिल्यास भाजपला फायदा होऊ शकेल.

सध्या पक्ष अनेक मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करीत असताना भंडारा गोंदियात मात्र उमेदवारा पेक्षा कोणत्या जातीचा उमेदवार याची चर्चा अधिक रंगली आहे. विशिष्ट जातीचा किंवा समाजाचा उमेदवार दिल्यास पक्षपार्टीला तिलांजली देत समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प आता महामेळाव्यातून होवू लागला आहे. त्यामुळे पक्षाचे नंतर बघू, लोकसभेसाठी समाजाचा उमेदवार कोणता पक्ष देतो हे आधी बघू , नंतर निर्णय घेवू असेच चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा…महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय आठ-दहा दिवसात -फडणवीस

काल झालेल्या तेली समाजाच्या मेळाव्यात वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भंडारा गोंदिया जिल्ह्यातील तेली समाजाचे नेते ब्रम्हानंद करंजेकार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, विधानपरिषदेचे आमदार अभिजत वंजारी, जिल्ह्यातील भाजपा नेते संजय कुंभलकर, माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, जि. प. अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, भाजपा नेते शेषराव गिऱ्हेपुंजे यासह तेली समाजाचे नेते मंडळींनी जिल्हास्तरीय भव्य तेली समाज मेळावा घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. काही झाले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत जो पक्ष तेली समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षालाच समाजाने मतदान करावे असे आवाहन करीत त्यांनी तेली उमेदवाराच्या प्रचाराची जणूकाही सुरुवात केली आहे.

दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार व माजी पालकमंत्री यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभांचा धडाका लावला असून, गावोगावचे दौरे करत कार्यकर्त्यांची जुळणी करून ते मोट बांधत आहेत. विकासकामांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात गावोगावचा कसा चेहरामोहरा बदलवला, हे सांगत आणखी कामे आपण भविष्यात कसे करणार आहोत, याची समर्पक मांडणी करताना दिसत आहेत. तर पोवार समाजाने देखील आम्हाला डावलल्यास येत्या निवडणुकीत आम्ही पक्षाला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशाराच दिला आहे.

हेही वाचा…तापमान वाढत असतांनाच आज मध्यरात्रीपासून कंत्राटी वीज कर्मचारी संपावर

पक्षानंतर व्यक्ती, व्यक्तीनंतर जातीपातीवर येऊन स्थिरावलेल्या राजकारणात मागील काही काळापासून तेली विरुध्द कुणबी असे राजकारण भंडारा गोंदिया लोकसभेत पाहावयास मिळत आहे, मात्र, तेली समाजाच्या व्यक्तीला तिकिट न देता सतत डावलण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला गेल्याची सल आता हा समाज बोलून दाखवीत आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीत केंद्रात दहा वर्षापासून सत्तेत असलेल्या पक्षाने तेली समाजाच्या व्यक्तीला तिकिट नाकारताच त्या पक्षाला भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पक्षाने जो उमेदवार दिला त्याच्या पाठीशी उभे राहायचे की, समाज म्हणेल तो उमेदवार निवडून द्यायचा की आणखी वेगळा निर्णय घ्यायचा? हा एक मोठा प्रश्न तेली समाजाच्या जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षातील नेते मंडळींपुढे उभा राहिला असून, तेली समाज आता पक्षाला की कुणाला मदत करणार, याची चर्चा सुरू आहे. त्याच अनुषंगाने दोन्ही जिल्ह्यातील तेली समाजाचे विविध राजकिय पक्षातील नेते मंडळी एकवटले असून महामेळाव्यातून ‘संकल्प २०२४ : संकल्प विजयाचा’ या नावाखाली लोकसभेची तयारी सुरू केली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, युती व आघाडी हा गुंता कसा सोडविणार, हाच प्रश्न आहे.

हेही वाचा…वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढेच जानकर म्हणाले “…अन्यथा भावना गवळी …”

यापूर्वी लोकसभा असो वा विधानसभा या दोन्ही निवडणुकीत पक्षनिष्ठेच्या आणाभाका घेत युती व आघाडीच्या उमेदवारांना राजकिय पक्षातील समाज नेत्यांनी आपला पक्ष समजून मदत केलेली आहे. नेहमीच लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीवेळी तेली कुणबी असा जातीचा विषय गाजत आलेला आहे. आतापर्यंत पक्षासाठी जात फॅक्टरला मुठमाती देत पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेला कार्यकर्ता युती व आघाडीने बघितला आहे. त्यामुळे युती आणि आघाडी आता हा प्रश्न कसा सोडवतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे….

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caste over party tensions rise in bhandara gondia amidst caste based candidate demands ksn 82 psg