नागपूर : नागपुरात एका गतिमंद तरुणीवर तिच्या दोन नातेवाईकांनी बलात्कार केल्यावर कथित जात पंचायतीने हे प्रकरण दडपण्यासाठी हस्तक्षेप करीत असल्याचे उघड झाले आहे. पंचायतीने पीडित कुटुंबाला पोलिसात तक्रार करण्यापासून परावृत्त करीत अनेक महिने त्यांची दिशाभूल केली. शेवटी कुटुंबाच्या तक्रारीवर पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहेत.

गतिमंद तरुणीच्या अवस्थेचा तिच्याच नात्यातील दोन नराधमांनी फायदा घेत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी कुर्नुल, तेलंगणा हा एप्रिल- २०१८ मध्ये त्याच्या पत्नीसोबत वाद झाल्यामुळे पीडितेच्या आईकडे काही दिवसांसाठी आश्रयाला आला होता. त्याने पीडित तरुणीची अवस्था बघून तिला धमकावून मे आणि जून महिन्यात तिच्यावर बलात्कार केला. हा प्रसंग तरुणीच्या आणखी एका नातेवाईकाने बघितला. त्यानेही तिला धमकी देत तिचे शारीरिक शोषण केले.

चार महिन्यानंतर ऑक्टोबर महिन्यात तरुणी गर्भवती झाल्यावर हा प्रकार पुढे आला. संतप्त कुटुंबाने दोघांवर गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली. हा प्रकार नातेवाईक आणि समाजातील काही प्रतिष्ठित लोकांना कळताच त्यांनी हस्तक्षेप करत पीडित कुटुंबाला पोलिसांकडे तक्रार देण्यापासून रोखले. जात पंचायत बसवून प्रकरण सोडवण्यासाठी कुटुंबावर दबाव आणला. २९ ऑक्टोबरला देशातील वेगवेगळ्या भागातून पंच पीडित कुटुंबीयांकडे आले. त्यांनी पीडितेचे लग्न लावून देऊ, तिचे आयुष्य सावरेल, असे आश्वासन दिले.

पंचायतीच्या विधीप्रमाणे शुद्धीकरण प्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले. नागपूर-अमरावती महामार्गावर आठवा मैल परिसरात स्मशानभूमीवर शुद्धीकरण विधीही करण्यात आला. त्यानंतर एक महिन्यात तरुणीच्या लग्नाचे आश्वासन देत पंचांसह आरोपीही परतले. त्यानंतर कुणीही तरुणीच्या लग्नाबाबत लक्ष देत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीच्या कुटुंबीयांनी वाडी पोलिसांकडे तक्रार दिली.

जात पंचायतीच्या कृत्याचा व्हिडीओ

तथाकथित जात पंचायतचे चित्र-विचित्र पद्धतीचे कृत्य पीडित कुटुंबाने मोबाईलवर व्हिडीओच्या मदतीने चित्रित केले होते. हा प्रकार पोलिसांनी बघितल्यावर तेही थक्क झाले. त्यांनी आरोपीच्या शोधासाठी काही पथके पाठवली असून शोध सुरू आहे.

Story img Loader