चंद्रपूर : दोन दिवसांत दोन महिलांचे बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात ब्रम्हपुरी वन विभागाला यश आले आहे. मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाल्यानंतर राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर वन विभागाने या वाघाला जेरबंद करण्याची मोहीम राबवली.
ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत शुक्रवार ३० व शनिवार ३१ डिसेंबरला शेतात काम करत असलेल्या नर्मदा प्रकाश भोयर व सीताबाई रामाजी सलामे या दोन महिलांचा वाघाने बळी घेतला. या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते. तोरगांव बुज. येथे तर या घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. जोपर्यंत वाघाला जेरबंद करीत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी वनखात्याला दिला होता. या घटनांची माहिती मिळताच पालकमंत्री मुनगंटीवार यांनी वनविभागाला वाघाला तत्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवार, १ जानेवारी रोजी तोरगाव बुज. येथे वाघाला जेरबंद करण्यात आले. वाघ जेरबंद होताच ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. व्याघ्र हल्ल्याच्या घटना पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, जंगलात रात्री जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.