दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून ३० हजारांची लाच घेताना सहायक कामगार आयुक्तांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. विनय कुमार जयस्वाल असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव आहे. सार्वजनिक उद्योगशिलता विभाग (पीएसयू) विभागातून सेवानिवृत्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतरही शासकीय सदनिका परत केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या विभागाने त्यांच्या ग्रँच्युईटीचे प्रकरण सहायक कामगार आयुक्त कार्यालय सीजीओ कॉम्पलेक्स, सेमीनरी हिल्स येथे वर्ग केले होते.
हेही वाचा >>> नागपूर : एकीकडे संपाच्या तयारीची लगबग, दुसरीकडे दोघांना २० हजारांची लाच घेताना अटक
दोघांचीही ग्रँच्युईटीचे रक्कम सहायक कामगार आयुक्त कार्यालय येथे जमा करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात दोघेही ती रक्कम मिळविण्यासाठी कार्यालयात गेले. सहायक कामगार आयुक्त विनय कुमार जयस्वाल याने त्यांनी प्रत्येकी ३० हजार असे ६०हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती दोघांचेही ३० हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली. त्या कर्मचाऱ्यांनी सीबीआय कार्यालयात तक्रार केली. पोलीस उपमहानिरीक्षक एम. एस. खान यांनी लगेच सापळा कारवाई करण्याचे आदेश दिले. आज मंगळवारी दुपारी विनय कुमार जयस्वाल यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने अटक केली. जयस्वाल यांच्या घरात सीबीआयचे झाडाझडती घेतली असून काही रक्कम आणि कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे.