नागपूर : सीएसआयआर-नीरीचे तत्कालीन संचालक डॉ. राकेश कुमार आणि संस्थेच्या चार शास्त्रज्ञांवर केंद्रीय तपास यंत्रणेने गुन्हे दाखल केल्यानंतर नीरीमध्ये खळबळ उडाली आहे. डॉ. राकेश कुमार नीरी नागपूरचे संचालक असताना त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. पावसाळ्यातच अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या छाटणे, पात्र कर्मचाऱ्यांऐवजी नातेवाईकांनाच प्राधान्य देण्याचा प्रकार त्यांनी केला. आधी नीरीमधील अनेक पदांवर रिक्त जागा सोडल्या आणि नंतर मुलाखतींमध्ये त्यांच्या दूरच्या नातेवाईकांना आणि ओळखीतल्यांना नोकऱ्या दिल्या. अनेक दिवसांपासून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेमध्ये याबाबत तक्रारी केल्या जात होत्या.
हेही वाचा >>> सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पायपीट थांबणार, ही आहेत कारणे
सीएसआयआरनेही या प्रकरणाची चौकशी केली. अनेक महिने चाललेल्या या तपासणीत काही गैरप्रकार उघडकीस आले. यामध्ये डॉ. राकेश कुमार यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात अशा अनेक संशोधनांवर पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला होता. संशोधनाच्या नावाखाली केवळ त्यांचे आराखडे बनवले गेले, कागदपत्रे तयार केली गेली. विभागात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून त्यातील खर्चावरही आक्षेप घेण्यात आले. नीरीमधील तक्रारींच्या चौकशीत आरोप सिद्ध झाल्यानंतर ९ एप्रिल २०२१ मध्ये त्यांना संचालक पदावरून काढण्यात आले आणि सीएसआयआर दिल्लीच्या मुख्यालयात पाठवण्यात आले. डॉ. राकेश कुमार यांच्याविरोधात त्यांचेच कर्मचारी उघडपणे समोर आले होते. काहींनी नावे घेऊन तक्रारी केल्या होत्या तर काहींनी अधिकृतपणे तपासात सहभाग घेतला होता. या संपूर्ण प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, डॉ. राकेश कुमार ३० एप्रिल २०२४ला सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्याआधीच २७ एप्रिल २०२४ला त्यांना निलंबित करण्यात आले. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्ली यांनी निलंबनाचा आदेश दिला. डॉ राकेश कुमार यांनी निलंबनाला आव्हान देण्यासाठी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली होती.