नागपूर : नरेंद्रनगरातील एका भाड्याच्या सदनिकेत राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरावर दिल्ली सीबीआयने छापा घातला. ही कारवाई मध्यरात्री १२ वाजतापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु होती. या कारवाईत नागपूर सीबीआयच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. ही कारवाई खूपच गुप्तपणे करण्यात आली, हे विशेष.
हेही वाचा >>> मनोहर जोशींना ‘या’ योजनेचा आनंद व दु:खही, वाचा असे का म्हणाले गडकरी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी काश्मीरमधून एक महिला नागपुरात राहायला आली होती. तिचा पती सध्या काश्मीरमध्ये राहतो. तिने नरेंद्रनगरातील एक मोठी सदनिका भाड्याने घेतली होती. तिचा पती दर महिन्याला तिला भेटायला येतो. ती महिला वर्धा रोडवरील एका नामांकित शाळेत शिक्षिका आहे. शिक्षिकेच्या घरावर छापा घालण्यासाठी सीबीआयने विशेष ऑपरेशन राबविले. त्यामध्ये नागपूर सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी मदतीसाठी घेतले. सीबीआयचे अधिकारी थेट दिल्लीहून कारने छापा घालण्यासाठी आले होते. शिक्षिकेच्या घरात जवळपास ५ तास कारवाई करण्यात आली. काही महत्वाचे दस्तावेज आणि मोबाईल, लॅपटॉप सीबीआयने जप्त केला. या छाप्याविषयी नागपूर सीबीआयचे अधिकारीसुद्धा बोलायला तयार नाहीत. गुप्त अभियानाअंतर्गत छापा घालण्यात आल्याची माहिती सीबीआयने दिली. मात्र, कारवाई कशासंदर्भात करण्यात आली, याबाबत सीबीआयने मौन बाळगले.
देशविघातक कृत्यात सहभाग?
शिक्षिका आणि तिचा पती मूळचे जम्मू-काश्मीरमधील आहेत. त्यांनी काश्मीर सोडले आणि थेट नागपूर गाठले. नागपूर शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता शिक्षिकेवर संशय निर्माण झाला आहे. देशविघातक कृत्याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.