नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झालेला नसताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी संकेतस्थळावरील नोंदणी बंद झाली आहे. त्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश कुठे घ्यावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्य शिक्षण मंडळाद्वारे ८ जूनला बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून विद्यापीठाद्वारे पदवी प्रवेशाचे वेळापत्रक दिले गेले. त्यानुसार विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची होती. त्यानुसार केवळ ४३ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी केली. विद्यापीठाच्या जागा बघता झालेली नोंदणी बरीच कमी आहे. मात्र, या नोंदणीच्या आधारावर ज्यांनी महाविद्यालयात अर्ज केलेत, त्यांच्या प्रवेशाची यादी गुणवत्तेनुसार लावण्यात येणार आहे. दरवर्षी शहरातील काही नामांकित महाविद्यालयांमध्ये पहिल्याच यादीमध्ये प्रवेश पूर्ण होत असतात. त्यामुळे सीबीएसईचा निकाल जाहीर न झाल्याने जे विद्यार्थी नोंदणी करू शकले नाही त्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, अद्याप सीबीएसई बारावीच्या निकालाची घोषणा झालेली नाही. येथील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात चांगल्या महाविद्यालयांमध्ये शिकत असतात. मात्र, निकालाअभावी त्यांची नोंदणीच झाली नसल्याने त्यांचा नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेश हुकण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाची भूमिका संशयास्पद
विद्यापीठाद्वारे २७ जूनला संकेतस्थळावरील नोंदणी बंद करण्यात आली. त्यामुळे नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थी व महाविद्यालयांकडून करण्यात आली. मात्र, त्यावर विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी पहिल्या यादीतील प्रवेश संपल्यावर प्रतीक्षा यादीमध्ये रिक्त राहणाऱ्या जागांवर उर्वरित विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावे, असे स्पष्ट केले होते. मात्र, एकदा प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर ज्याने अर्ज केलेत, त्यांचीच प्रतीक्षा यादी महाविद्यालयांना लावता येणार आहे. त्यामुळे नव्याने नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात कसा प्रवेश मिळेल, हा खरा प्रश्न आहे.