नागपूर : राज्यभरातील कारागृहात कैद्यांना गांजा, ड्रग्ज, मोबाईल आणि अन्य वस्तू पुरवल्या जातात तसेच कैद्यांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना नेहमी समोर येतात. या सर्व प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी राज्यातील ६० कारागृहांमध्ये ‘तिसरा डोळा’ अर्थात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक कारागृहात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याची माहिती पुणे महानिरीक्षक कार्यालयातून समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील सर्वच कारागृहामधील कारभारामध्ये पादर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे बसविण्यासाठी तत्कालिन अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी पुढाकार घेतला होता. राज्यातील कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबत उच्च न्यायालयाने राज्यातील कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश राज्यशासनास दिले होते. त्यानुसार २०१७ पासून शासनाने राज्यातील कारागृहांची सुरक्षा व्यवस्था आधुनिक करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात १४ कोटी ४४ लाख ७१ हजार २७६ आणि बॉडी स्कॅनरसाठी ९ कोटी १२ लाख अशा एकूण २३ कोटी ५६ लाख रुपये मंजूर झाले होते. तर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी जवळपास ९० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित होता. राज्य कारागृह विभागाने आतापर्यंत ६० पैकी ३२ कारागृहात सीसीटीव्ही यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे उर्वरित २८ कारागृहाचा कारभार रामभरोसे आहे. राज्याभरातील मध्यवर्ती, जिल्हा व अन्य कारागृहात ४० हजार ६०० वर कैद्यांची संख्या आहे. कैद्यांच्या प्रमाणात कारागृहातील सुरक्षारक्षकांची संख्या मंजूर संख्येपेक्षा जवळपास निम्मी आहे. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी सीसीटीव्ही आणि बॉडी स्कॅनर यंत्र लावण्याची गरज निर्माण झाली होती. मात्र, राज्यातील अजुनही अर्धेअधिक कारागृहात सीसीटीव्ही यंत्रणाच बसविण्यात आली नाही. त्यामुळे गृहविभागाचे कारागृह विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा…Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…

नागपूर कारागृह विभागावर अन्याय

कारागृहाच्या नागपूर विभागात अन्य विभागाच्या तुलनेत सर्वाधिक कारागृहे आहेत. नागपूर विभागातील १७ पैकी ३ कारागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्यामध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह आणि गडचिरोली जिल्हा कारागृह या कारागृहांचा समावेश आहे. भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि मोर्शी कारागृहात अद्यापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही. त्यामुळे अन्य कारागृहांच्या तुलनेत नागपूर विभागावर अन्याय झाल्याची भावना आहे.

नागपूर कारागृहातील सर्वच सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. कारागृहातील कैद्यांवर विशेष लक्ष ठेवण्यास मदत होत आहे. कारागृहातील सर्वच भाग सीसीटीव्हीच्या फुटेजच्या जाळ्यात येत आहे. सीसीटीव्हीमुळे कारागृहातील कारभार पारदर्शक होत आहे, असे नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांनी सांगितले.

हेही वाचा…“राणा दाम्‍पत्‍याला अमरावती जिल्‍ह्यात भाजप संपवायची आहे”,बच्‍चू कडू यांची टीका

सर्वाधिक सीटीटीव्ही कॅमेरे असलेले कारागृह

येरवडा – ८१२ कॅमेरे

नागपूर – ७९६ कॅमेरे

कोल्हापूर – ६१५ कॅमेरे

तळोजा – ४५२ कॅमेरे

ठाणे – ४५१ कॅमेरे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions adk 83 sud 02