आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन
नागपूर : करोनामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे शक्य नाही. प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार आणि नियमांचे पालन करून घरीच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
मुंढे यांनी शहरातील काही गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. २२ ऑगस्टला गणेश चतुर्थी असून त्या दिवसापासून दीड ते दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र हा उत्सव साजरा करताना विशेष काळजी घ्यायची आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार घरगुती गणपती मूर्तीची उंची दोन फुटांपर्यंत आणि सार्वजनिक गणपतीची उंची चार फुटांपर्यंतच असायला हवी.
या गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे. यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू किंवा संगमरवरी मूर्तीचेच पूजन करावे. हे शक्य नसेल आणि मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असेल तर तिचे विसर्जन शक्यतो घरी करावे. घरी विसर्जन अशक्य असेल तर कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात यावे. विसर्जनाची मिरवणूक न काढता आणि विसर्जनस्थळी कोणतीही आरती न घेता कमीत कमी वेळात घरी पोहचावे. शासनाच्या या निर्देशांचे पालन होईल याची सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन आयुक्तांनी केले.
असे आहेत नियम
* घरगुती मूर्ती २ फूट
* सार्वजानिक गणेशोत्सव मंडळात ४ फूट
* प्रत्येकाने मुखपट्टी वापरणे बंधनकारक
* कृत्रिम तलावात विसर्जन
* शक्यतो संगमरवरी किंवा धातूच्या मूर्तीचे पूजन
* गणेश मंडळाने वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक
* दर्शनाला येणाऱ्यांनी सामाजिक अंतर पाळावे
* मंडळाने थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी
* जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी
मुंढेंचा पुन्हा कारवाईचा धडाका
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी सी.ए.रोड, गोळीबार चौक, मस्कासाथ, इतवारी, मच्छीबाजार आदी भागांमध्ये आकस्मिक भेट दिली. फुटपाथवरी दुकान, दुकानातील गर्दी अशा सर्वासह चितारओळीतील मूर्तिकारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमाचे पालन केले नाही तर २५ हजार रुपये दंड ठोठावण्याचा इशारा आयुक्तांनी दिला. त्यांनी सेंट्रल अॅव्हेन्यूवरील फुटपाथवर सामान ठेवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला व त्यांच्याकडून १० हजारांचा दंड वसूल केला. त्यानंतर जागन्नाथ बुधवारी भागात दंडात्मक कारवाई केली. मच्छीबाजार जुने मोटार स्टँड भागात हार्डवेअर विक्रत्यांनी संपूर्ण साहित्य फुटपाथवर ठेवले होते. आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या पथकाला बोलावून ते साहित्य जप्त केले. रस्ते, फुटपाथ मोकळे राहावेत, या उद्देशाने ही कारवाई केली. मात्र दंड भरूनही नियमांचे उल्लंघन करणे सोडले नाही तर यापुढे २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल, असा इशाराही मुंढे यांनी दिला.