बुलढाणा येथे १२ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज करून स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर व विदर्भ प्रमुख दामुअण्णा इंगोले यांच्यासह २४ कार्यकर्त्यांना अटक केली. त्याच्या निषेधार्थ आज मालेगाव येथे स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना गुलाबाचे फूल देऊन ‘व्हॅलेंटाईनचा’चा अनोखा संदेश दिला आहे.
हेही वाचा- नागपूर: अमित शहा यांचा संघ मुख्यालय भेटीचा मुहूर्त ठरला, दीक्षाभूमीलाही जाणार
पीकविमा, अतिवृष्टीची मदत, सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी, या मागण्यांसाठी मागील दोन महिन्यांपासून स्वाभिमानीने रान उठवले होते. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे प्रंचड नुकसान झालेले असताना शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होत नसल्याने व अतिवृष्टीची मदत द्यावी, सोयाबीन, कापसाच्या भावात वाढ करावी या मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांना घेऊन मोर्चे काढले होते. मात्र त्यानंतरही एआयसी कंपनीने पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली नव्हती व सरकारने नुकसानभरपाईची रक्कमही दिली नाही. त्यामुळे आक्रमक होत रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात शनिवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.
आता या प्रकरणात तुपकर व दामुअण्णा इंगोले यांना अटक झाल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. १३ फेब्रुवारीला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मालेगाव पोलिसांना व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाचे फूल देऊन अनोखे आंदोलन केले.