लोकसत्ता टीम
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील वार्डात रुग्णाचे पाय वर ठेवण्यासाठी चक्क रुग्ण झोपलेल्या रुग्णशय्येखालील दोन पायाला सिमेंटचे गट्टू लावले जात आहे. हे गट्टू सरकून रुग्णाचा अपघात झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
मेयो रुग्णालयातील वार्ड क्रमांक २६ हा स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचा आहे. या वार्डात प्रसूतीनंतर महिला व नवजात बाळाला ठेवले जाते. मंगळवारी येथील एका रुग्ण बसलेल्या रुग्णशय्येच्या दोन पायाखाली चक्क सिमेंटचे दोन गट्टू लावण्यात आले होते. रुग्णशय्येच्या एका भागातून उंची वाढवण्यासाठी हे केल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कुत्तरमारे यांना सांगितले.
आणखी वाचा-चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरवर हल्ला
या महिलेचे पाय वर ठेवण्यासाठी विशिष्ट रुग्णशय्या उपलब्ध करणे अपेक्षीत होते. परंतु, रुग्ण झोपलेल्या रुग्णशय्येच्या दोन पायाखाली गट्टू लावून या रुग्णाच्या जिवाशी खेळ सुरू आहे. हे धक्कादायक चित्र बघता मेयो रुग्णालयात डोके व पाय वर खाली करण्याची सोय असलेले रुग्णशय्या शासनाने दिली नाही काय? गरिबांना चांगला उपचार घेण्याचा येथे अधिकार नाही काय? हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अधिकारी काय म्हणतात…
काही वैद्यकीय कारणास्तव रुग्णाला डोके खाली व पाय वर करावे लागतात. त्याला आम्ही ‘हेड लो पोजिशन’ म्हणतो. त्यासाठी या वार्डात रुग्णाच्या रुग्णशय्येखाली गट्टू लावले असावे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. -डॉ. राधा मुंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेयो रुग्णालय, नागपूर.