नागपूर : शहरातील प्रत्येक भागातील रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. मात्र, यामुळे नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. याबाबत राज्य शासनाच्या विविध विभागांसह महापालिका, नागपूर सुधार प्रन्यासला तीन आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. जनमंच संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.
याचिकेवर न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. शहरातील रस्त्यांच्या सिमेंटीकरणामुळे अनेक जीवघेणे आजार वाढत आहे. आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित विविध संशोधनांचा दाखला देत सिमेंटीकरणाचे दुष्परिणाम याचिकाकर्त्याने सांगितले. श्वसन संबंधित आजार, पोटाचे आजार यासह कर्करोगासारखे विविध आजार सिमेंटच्या धुलीकणांमुळे होण्याची शक्यता असते. शहरातील सिमेंटचे रस्ते तयार करताना ‘फ्लाय ॲश’ वापरण्यात येत आहे. यामुळे परिस्थिती अधिक भयावह होत आहे. संविधानाच्या कलम २१ मध्ये नागरिकांना आरोग्याचा अधिकार दिला गेला आहे. मात्र, सिमेंटीकरणामुळे याचे उल्लंघन होत आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
तापमानवाढीसाठी कारणीभूत
डांबर ऐवजी सिमेंटचा वापर केल्याने कार्बन फूटप्रिंट वाढत आहे. शहरात सध्या ७०० किलोमीटरपेक्षा अधिक सिमेंटच्या रस्त्याचे जाळे आहे. यामुळे शहराचे तापमान जलदगतीने वाढत आहे. सिमेंटच्या रस्त्यांमुळे अपघातांची संख्या देखील वाढली आहे. डांबर रस्त्यावर जखमी होण्याची शक्यता कमी असते, मात्र सिमेंटच्या रस्त्यावर अपघात झाल्याने गंभीर इजा होण्याचा धोका असतो. विशेष म्हणजे, सिमेंट रस्त्यावरून दुचाकीसह इतर वाहने घसरण्याची शक्यता जास्त असते. शहरातील रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक रस्त्यांना भेगाही पडल्या आहेत. नागरिकांनी शहरात सिमेंटचे रस्ते नकोत, यासाठी विशेष अभियान राबवले होते. पावसाळ्यात पाणी साचणे, कार्बन उत्सर्जनाचे वाढते प्रमाण, तापमानवाढ यामुळे शहरातील नागरिकांनी सिमेंटच्या रस्ताविरोधात हस्ताक्षर अभियान राबवले असल्याची माहिती याचिकेत नमूद करण्यात आली.
मागणी काय?
- नागरिकांवर होणाऱ्या आरोग्य परिणामांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करावी.
- सिमेंटच्या रस्त्यांच्या तांत्रिक बाबी तपासण्यासाठी स्वतंत्र तपासणी समिती नेमावी, पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करावी.
- शहरात उष्णतेच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्वायरमेंट’ला अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावे.
- मेयो आणि मेडिकल रुग्णालयात श्वसन, त्वचा, डोळे संबंधित येणाऱ्या रुग्णांची आकडेवारी सादर करावी.
- शहरातील मलनिस्सारण वाहिनी, जलवाहिनी, विजेचे तार, पाणीपुरवठा वाहिनीच्या सर्वेक्षणाचे आदेश द्यावे.