भंडारा : मोक्षप्राप्तीसाठीचा प्रवास सुरू होतो तो स्मशानघाटाकडे. याच ठिकाणी रूढीप्रमाणे मृतदेहावर अंत्यसंस्कार करून मृतात्म्यास शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते. मात्र भंडारा जिल्ह्यात असे एक गाव ज्या गावात कोणाचाही मृत्यू झाला तरी गावकऱ्यांचा थरकाप उडतो. त्याचे कारण तसेच आहे. या गावातील मृतदेहाला मोक्षधामाकडे नेताना या ग्रामस्थांना अक्षरशः नाना नरकयातना सोसाव्या लागतात. विशेषतः पावसाळ्यात कुणी मरण पावले तर तारेवरची कसरत करत या मंडळींना मोक्षधामाकडे जावे लागते.
सिहोरा बपेरा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या मांगली (स) येथील मोक्षधामकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांना ही तारेवरची कसरत करावी लागते. मोक्षधामपर्यंत जाण्यासाठी काँक्रीटचा रस्ता नसल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना चिखलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मांगली येथील ग्रामस्थांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही चिखलमय वाटेवरून जावे लागते. असे म्हणतात की, मृत्यूनंतर माणसाच्या सर्व समस्या दूर होतात. मात्र येथे मृत्यूनंतरही खड्डे आणि चिखलमय रस्ता पाठ सोडत नसल्याने अखेरचा प्रवासही त्रासदायक ठरत आहे. मांगलीतील मोक्षधामपर्यंत ५०० मीटरचा रस्ता आहे जो पूर्वी उभारण्यात आला होता. मात्र पक्का रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था होत असते. लोकं प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा >>> अमरावती : मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन अंगलट; २३५० वाहनचालकांकडून ३७ लाखांचा दंड वसूल
मोक्षधामपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी स्थानिक पातळीवर निधीची कमतरता दिसून येत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी भुवन पारधी व नागरिकांनी केली आहे. समस्यांनी घेरलेल्या मांगली येथील रहिवाशांना आधीच शिक्षणाची चिंता आहे. शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याची मागणी होत आहे, मात्र बांधकामाच्या मंजुरीचा प्रस्ताव रखडला आहे. आता मृत्यूच्या शेवटच्या प्रवासाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, मोक्षधामाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. चिखलातून गावकऱ्यांना प्रवास करावा लागतो. ग्रामपंचायत स्तरावर निधी उपलब्ध होत नसल्याने या कामासाठी निधी वाटप व मंजुरीसाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे, असे मांगलीच्या सरपंच शुभांगी पारधी यांनी सांगितले.