गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रप्रमुखाने बारावीच्या परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपये घेतले. यातीलच एका विद्यार्थ्याने प्राध्यापकाला पैसे देतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. याप्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून आरोपी प्राध्यापक किशोर कोल्हे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी कुरखेडा येथे प्राध्यापक किशोर कोल्हे यांची परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपये घेतले. व्हिडीओमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी त्यांना पैसे दिले त्यांचे नाव व मोबाइल नंबर ते लिहून घेत आहेत. पैसे देतेवेळी सात ते आठ विद्यार्थी होते. त्यांच्यापैकी एकाने हा व्हिडिओ काढला. परंतु, केंद्रप्रमुखाला हे कळताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्या विद्यार्थ्याला कोल्हे यांनी घरी बोलावून काही पैसे देत व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून त्यांना तात्काळ केंद्रप्रमुखपदावरून दूर केले व पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – धक्कादायक! रक्षकच झाला भक्षक, तक्रारीसाठी आलेल्या युवतीवर ठाणेदाराने केला बलात्कार
कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा
दहावी व बारावीच्या परीक्षेपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, कुरखेड्यात घडलेल्या प्रकारावरून प्रशासनाच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. केंद्रप्रमुख असलेल्या प्राध्यापकाने कॉपी करू देण्यासाठी चक्क पैसे वसूल करणे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे आहे, असे मत सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.