राज्यातील पहिलेच केंद्र; डॉक्टरांना नवीन उपचार पद्धतीचे प्रशिक्षण मिळणार

महेश बोकडे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राज्यातील पहिले ‘दंत’शी संबंधित सेंटर ऑफ एक्सलेंस फॉर जीएमजे हे अद्ययावत केंद्र नागपुरात सुमारे महिनाभरात कार्यान्वित होणार आहे. सध्या राज्यातील एकाही दंत महाविद्यालयात हे केंद्र नाही. या केंद्रामुळे  दंतरोग तज्ज्ञांना उपचाराचे नवीन तंत्र शिकता येईल.येथील प्रशिक्षित डॉक्टरांमुळे रुग्णांनाही नवीन पद्धतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

जबडय़ाच्या जोडाचे किंवा जबडय़ातील स्नायूचे आजार साधारण ५ ते १२ टक्क्के लोकांमध्ये आढळतात. करोनापश्चात हा आजार सर्वत्र वाढला आहे. रुग्णांना तोंड उघडताना तसेच जेवताना वेदना होतात. या आजाराच्या रुग्णांचे जबडय़ाच्या हाडाचे जोड डोक्याच्या हाडाला जुळलेले असल्याने या भागात शल्यक्रिया किंवा उपचार करणे अतिशय जटील असते. तसेच शल्यक्रियेदरम्यान चेहऱ्याची एक महत्त्वाची नस दुखावल्यास चेहऱ्यात तात्पुरती किंवा कायमस्वरूपी विकृती येण्याचाही धोका असतो. या रुग्णांवर शल्यक्रिया करण्यासाठी टेंपोरोबुलर जॉईंट आर्थोस्कोपी हे यंत्र महत्त्वाचे असते. शासकीय दंत महाविद्यालयात सुमारे महिनाभरात हे यंत्र कार्यान्वित होणार असून त्यानंतर येथे यासाठीचे कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापित केले जाणार आहे. या केंद्रामुळे  राज्यासह शेजारच्या राज्यातील नवीन दंतरोग तज्ज्ञांना  प्रशिक्षण व अद्ययावत उपचार पद्धतीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.  या यंत्रासह केंद्रासाठी शासकीय दंत महाविद्यालयातील मुख दंतशल्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातारकर, तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, अधिष्ठाता डॉ. मंगेश फडणाईक, डॉ. रितेश कळसकर यांनी परिश्रम घेतले.

जबडा उघडण्यास त्रास, जेवताना जीएमजे जॉईंट दुखणे, तोंड उघडता न येणे किंवा उघडताना असह्य़ वेदना, अन्न चावता न येणे ही जबडय़ाच्या गंभीर आजाराची लक्षणे आहेत.  अशा बऱ्याच रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करता येतो. दंत महाविद्यालयात रोज ५ ते ६ रुग्ण असे येतात. येथे महिनाभरात या शस्त्रक्रियेसाठी उपयोगी टेंपोरोबुलर जॉईंट आर्थोस्कोपी कार्यान्वित होऊन त्यावर रुग्णांवर शस्त्रक्रिया तर नवीन डॉक्टरांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. राज्यातील शासकीय व खासगी दंत महाविद्यालयातील हे पहिले या पद्धतीचे प्रशिक्षण केंद्र असेल.’’

– प्रा. डॉ. अभय दातारकर, विभाग प्रमुख, मुख्य शल्यशास्त्र विभाग.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Center of excellence for gmj arthroscopy at nagpur zws