महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : राज्यात शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसह वैद्यकीय शिक्षकांची संख्या वाढत आहे. परंतु या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी (एमईटी)चे राज्यात एक नोडल आणि दोनच प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र असल्याने अनेक शिक्षकांना प्रशिक्षणासाठी ताटकळत राहावे लागते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षक संघटनेने संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षकांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी (एमईटी)चे तीन दिवसीय प्रशिक्षण सक्तीचे केले. परंतु राज्यात सध्या वर्धेतील सावंगी मेघे (वर्धा) या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एकच नोडल प्रशिक्षण केंद्र ‘एनएमसी’कडून मंजूर आहे. नागपुरातील मेडिकल आणि मुंबईतील केईएम महाविद्यालयात दोन प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र आहेत.
आणखी वाचा-रणसंग्राम लोकसभेचा : बुलढाण्यातील लढत तिरंगी वळणावर; अपक्ष, वंचितमुळे होणारे मतविभाजन ठरणार निर्णायक
राज्यात एमईटीचे नोडल केंद्र वाढायला हवेत. या केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना राज्यातील प्रादेशिक केंद्रात इतर वैद्यकीय शिक्षकांना प्रशिक्षण देता येते. परंतु नोडल केंद्र वाढत नसल्याने आणि वर्धेतील केंद्रात प्रशिक्षण देण्याच्या उमेदवारांच्या संख्येला मर्यादा असल्याने अनेक शिक्षकांना नोडल केंद्रात प्रशिक्षणासाठी वाट बघावी लागते. यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटना संतापली असून त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात एक नोडल प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.
“अनेक वैद्यकीय शिक्षक नोडल एमईटी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी इच्छुक आहेत. हे प्रशिक्षण झाल्यास ते प्रादेशिक केंद्रात वैद्यकीय शिक्षकांना प्रशिक्षण देऊ शकतील. त्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात एक नोडल केंद्र सुरू करायला हवे.” -डॉ. समीर गोलावार, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटना.