वर्धा : सध्या बेरोजगारीचा प्रश्न ज्वलंत समजला जात आहे. त्यातही शासकीय नोकरभरती कमीच. म्हणून शासकीय पद भरतीची विविध विषयातील बेरोजगार चातकाप्रमाणे वाट बघत असतात. आता व्हेटरनरी म्हणजेच पशुविज्ञान शाखेच्या बेरोजगारांना संधी उपलब्ध झाली आहे.
केंद्राच्या भारतीय पशुपालन महामंडळाने २०२५ मध्ये रिक्त जागा भरण्याची अधिसूचना जारी केली आहे. ऍनिमल हसबँडरी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडतर्फे ही सूचना आहे. बिपीएनएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळाने २ हजार १५२ जागा भरणार असल्याचे जाहीर केले आहे.यात विविध गटाच्या जागा रिक्त आहेत. पशुधन फार्म इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, पशुधन फार्म इन्व्हेस्टमेंट असिस्टंट व पशुधन फार्म ऑपेरेशन असिस्टंट अशा जागा आहेत.. पात्र असलेले इच्छुक उमेदवार हे १२ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत वेबसाईटला भेट देत अर्ज करू शकतात.
या पदांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. पशुधन शेती गुंतवणूक अधिकारी या पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. पशुधन शेती गुंतवणूक सहाय्यक बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पशुधन शेती प्रक्रिया सहायक पदासाठी दहावी उत्तीर्ण पात्र ठरतो. ईच्छुक उमेदवारास प्रथम भारतीय पशुपालन डॉट कॉम या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटवरील ‘ ऑनलाईन अर्ज करा ‘ या लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढील सूचना येणार. मग ऑनलाईन अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे तसेच फोटो, स्वाक्षरी अपलोड करणे क्रम प्राप्त आहे.त्यानंतर पात्र उमेदवारांना डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग माध्यमातून अर्ज शुल्क भरावे लागणार. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्ज सबमिट करीत प्रिंट आऊट काढता येईल.
दहावी उत्तीर्ण ते पदवीधर अश्या पातळीवर रोजगार उपलब्ध असण्याची ही संधी केंद्रीय शासन पातळीवर मिळत आहे. संबंधित विषयांचेच नव्हे तर केवळ दहावी उत्तीर्ण असणारे या मंडळात नौकरी प्राप्त करू शकणार आहेत. तसेच पशु वैद्यकीय पदवी प्राप्त करणारे शेकडो पदवीधर आज बेरोजगार असल्याचे सांगितल्या जात असते. त्यांना पण या जम्बो पद भरतीत संधी उपलब्ध होत आहे. राज्यात पशु पालन खात्यात शेकडो जागा रिक्त असल्याचे बोलल्या जाते. परिणामी जिल्हा पातळीवर एकाच अधिकाऱ्यांस अनेक पदांची प्रभारी जबाबदारी सोपविल्या जात असते. आता केंद्रीय पातळीवर ही मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने महाराष्ट्रातील पदवीधर ती संधी साधू शकतात.