लोकसत्ता टीम
चंद्रपूर : दंगली पेटविल्याशिवाय भाजप सत्तेत येवू शकत नाही. गुजरातमधील गोध्रा कांडनंतर देशात भाजपला बळ मिळाले. देशात पुन्हा सत्ता मिळत नाही, याची जाणीव झाल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी दुसरे गोध्रा कांड घडविण्याच्या तयारीत आहे. येत्या जानेवारी महिन्यात अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन आहे. या कार्यक्रमात देशभरातून लाखो कारसेवक, रामभक्त सहभागी होणार आहेत. रामलल्लाचे दर्शन घेवून कारसेवक निघतील तेव्हा दंगली घडविल्या जातील, उद्रेक केला जाईल. यात काही कारसेवकांचा जीव जाईल. त्या भरोशावर देशातील सत्तेसाठी दावा ठोकला जाईल, असा खळबळजनक आरोप राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, संदिप गड्डमवार, डॉ. विजय देवतळे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे झालेल्या स्फोटात उपयोगात आणलेली स्फोटके कुठून आली, याचा शोध अजून लागलेला नाही. आरोपी मिळाले नाहीत. गुजरातच्या गृहमंत्र्यांची हत्या झाली, त्या प्रकरणातील आरोपीही मिळाले नाही, हे कसे काय शक्य आहे? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा-जिवंत असताना अन्नदाता होता, जग सोडताना प्राणदाता झाला…शेतकऱ्याच्या अवयवदानातून पाच कुटुंबांना आधार
केंद्राच्या सात योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाली, असे ‘कॅग’ म्हणत आहे. यातील भ्रष्टाचारी कोण, याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे. देशात कायदे झपाट्याने बदलले जात आहे. त्यामुळे २०२४ नंतर निवडणुका होणारच नाही, अशी स्थिती आहे. केंद्रीय निवडणुक आयुक्तांच्या निवड समितीतून मुख्य सरन्यायाधिशांना वगळण्याचे विधेयक मांडण्यात आले आहे. १९२७ चा वन कायदा बदलला आहे. त्यामुळेच आता उद्योगपतींना खाण वाटप सोपे झाले आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
विधानसभेचा निकाल पाहूनच लोकसभा निवडणूक
येत्या डिसेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहून लोकसभा निवडणूक घेतली जाईल, असे भाकित वडेट्टीवार यांनी वर्तवले आहे. विरोधी पक्षनेते पदाची दुसऱ्यांदा संधी मिळालेला काँग्रेसचा मी एकमेव कार्यकर्ता आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी व मल्लीकार्जुन खरगे यांनी माझ्यावर विश्वास टाकला. काँग्रेसला राज्यात टी-२० सामने खेळणारा खेळाडू हवा होता. त्यामुळेच मला विरोधी पक्षनेते पद मिळाले, असेही ते म्हणाले.