नागपूर : केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आरएसएसच्या कार्यक्रमांना सरकारी कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यावरील बंदी सरकारने हटवली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार आहे. ही बंदी तत्कालीन काँग्रेस सरकारने १९६६ मध्ये लागू केली होती. आता ५८ वर्षांनंतर ती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या एका वक्तव्याचा विरोध करत संघावर बंदी घालावी आणि भागवत याना अटक करावी अशी मागणी पुढे येत आहे. काय प्रकरण आहे बघू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम मंदिर प्रतिष्ठापणेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले होते. याविरोधात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात महाल संघ मुख्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. आंदोलक संघ मुख्यालयाकडे जात असतानाच त्यांना चिटणवीस पार्कजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आक्रमक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संघावर बंदी घालावी तसेच डॉ. भागवत यांना अटक करावी अशी मागणी केली.

हेही वाचा…वडेट्टीवार महायुतीवर मसंतापले,”हा काय सावळा गोंधळ सुरू आहे?

इंदूर येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना ‘राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात डॉ. भागवत म्हणाले की, “राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हे भारताचे खरे स्वातंत्र्य आहे. हा दिवस पौष शुक्ल द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे, जो शतकानुशतके बाह्य आक्रमणाने सहन करणाऱ्या भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्थापना याच दिवशी झाली’’. त्यांच्या या वक्तव्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही विरोध केला होता. भागवत यांचे वक्तव्य म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर रविवारी महालच्या देवडीया काँग्रेस भवन येथून युवक काँग्रेसने आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी संघाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलक संघ मुख्यालयाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना चिटणवीस पार्कजवळ अडवले. तसेच आंदोलन थांबवण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आंदोलक आक्रमक झाल्याने पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी मोहन भागवत यांना अटक करा. तसेच, संघावर बंदी घाला अशा घोषणा दिल्या. यावेळी अजित सिंह, तौशिफ खान, डॉ. श्रीनिवास, आसिफ शेख, नयन तलवलकर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा…सप्ताहभर सुंदर व मनोवेधक आकाश नजाऱ्याचे दर्शन; सर्व ग्रह सूर्याच्या…

डॉ. भागवत यांचे वक्तव्य म्हणजे देशद्रोह आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांचा त्यांनी अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. उदय भानू चिब, राष्ट्रीय अध्यक्ष, युवक काँग्रेस.

संघाकडून कायमच देशविरोधी विधाने केली जातात. महात्मा गांधी आणि अनेक थोर देशभक्तांचा संघाकडून अपमान केला जातो. त्यामुळे संघावर बंदी घालणे आवश्यक आहे. कुणाल राऊत, प्रदेश अध्यक्ष युवक काँग्रेस.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government lifted ban on government employees attending rashtriya swayamsevak sangh events dag 87 sud 02