नागपूर : केंद्र सरकारच्या अखत्यारितील क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे (क्यूसीआय) मूल्यांकन आता प्रत्येक दंत महाविद्यालयांसाठी बंधनकारक होणार आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालयासह देशातील दहा दंत महाविद्यालयांचे ‘क्यूसीआय’ चमूकडून मूल्यांकनासाठी निरीक्षणही पार पडले आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित ‘क्यूसीआय’ ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेचा उद्देश वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारणे हा आहे. त्यामुळे ‘क्यूसीआय’ आणि भारतीय दंत परिषदेच्या संयुक्त विद्यमाने पथदर्शी प्रकल्पानुसार देशातील दहा दंत महाविद्यालयांचे निरीक्षण केले गेले. महाराष्ट्रातून नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय या एकमात्र संस्थेची या प्रकल्पात निवड करण्यात आली.

हेही वाचा : वाशिम : लग्नसमारंभासाठी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात दोन ठार

नागपुरात निरीक्षणाला आलेल्या चमूने महाविद्यालय व रुग्णालयात मागील वर्षभरात रुग्णांचे उपचार, चाचण्यासह सर्व सोयी-सुविधांची माहिती घेतली. चमूकडून येथील बहुतांश चांगल्या सोयी- सुविधांबाबत समाधान व्यक्त केले गेले. काही त्रुटी दूर करण्याचीही सूचना करण्यात आली. या त्रुटी दूर झाल्यावर चमूकडून मूल्यांकन प्रमाणपत्राबाबतची प्रक्रिया केली जाईल.

‘क्यूसीआय’च्या चमूने मूल्यांकनासाठी येथील सोयी-सुविधांची पाहणी केली. लवकरच मूल्यांकन प्रमाणपत्र मिळण्याचा विश्वास आहे. अशा प्रकारचे मूल्यांकन देशातील सर्व दंत महाविद्यालयांना बंधनकारक होणार आहे.

डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

हेही वाचा : नागपूर : कुणाल बॅटरीचा भरचौकात खून

या दंत महाविद्यालयांचे निरीक्षण पूर्ण….

  • मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेन्टल सायन्सेस (नवी दिल्ली),
  • इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, शित्रा ओ अनुसंधान (भुवनेश्वर)
  • शासकीय दंत महाविद्यालय व संशोधन संस्था, बेंगळुरू (कर्नाटक)
  • सविथा दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, चेन्नई (तामिळनाडू)
  • शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, अहमदाबाद (गुजरात)
  • पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, रोहतक (हरियाणा)
  • गोवा दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, गोवा (गोवा)
  • श्री रामचंद्र दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, चेन्नई (तामिळनाडू)
  • एम.एस. रामय्या दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, बंगळुरू (कर्नाटक)
  • शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर (महाराष्ट्र)