लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध असलेला यवतमाळ जिल्हा आता गुन्हेगारी जिल्हा म्हणून नावारूपास येत आहे. त्याच अनुषंगाने यवतमाळच्या गुन्हेगारीचा विषय थेट लोकसभेत पोहोचला. यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी गुरूवारी लोकसभेत चर्चेदरम्यान यवतमाळच्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारनेच उपाययोजना करावी, अशी थेट माणगी तालिका सभापतींकडे केली.

शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख सतत चढता आहे. जिल्ह्यात खून, प्राणघातक हल्ले, चोरी, दरोडा, महिलांची छेड आदी गुन्हे सातत्याने घडत आहेत. गेल्या वर्षी ७७ खून, दरोड्याचे १३ तर जबरी चोरीचे ८९ गुन्हे घडल्याचा आकडा खासदार देशमुख यांनी लोकसभेत वाचून दाखविला. यवतमाळ शहरात चार गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असून, ३२ अट्टल गुन्हेगार असल्याने नागरिक दहशीतीत असल्याचे सांगितले. यवतमाळात रस्याांने जाताना सायकलला सायकलचा धक्का लागला तरी खून होत असल्याचे देशमुख म्हणाले. क्षुल्लक कारणातून वाद घालून खून केले जातात. बहुतांश गुन्ह्यांत अल्पवयीन तरूणांचा सहभाग चिंतेचा असल्याचेही देशमुख यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. सर्वत्र सहज उपलब्ध असलेला गांजा, एमडी पावडर, दारू यामुळे तरूण पिढी व्यसनांकडे वळली असून गुन्हेगारीतून झटपट पैसा मिळत असल्याने अनेक टोळ्या अल्पवयीन मुलांना हाताशी पकडून गुन्हे करत असल्याचे सांगितले. बंदुकीच्या धाकावर दुकान, घरे, जागा बळकावणे, निवडणुकीत समांतर यंत्रणा तयार करून मतदान होवू न देणे असले प्रकार होत असल्याचे संजय देशमुख यांना सभागृहात सांगितले.

आणखी वाचा-विवाहित प्रियकरासाठी संसार मोडला अन् आता…

यवतमाळची वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करून व्यसनाधीन झालेल्या तरूणाईला त्यातून बाहेर काढावे, पुनर्वसन केंद्र उघडण्यात यावे, रोजगार उपलब्ध करून द्यावा, यवतमाळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवावी, अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेत केली. यापूर्वी राज्याच्या विधिमंडळात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यवतमाळच्या गुन्हेगारीवर भाष्य करून महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. आता येथील गुन्हेगारीचा विषय थेट लोकसभेत मांडण्यात आल्याने केंद्र व राज्य सरकार विधानसभा निवडणुकीपूर्वी पावले उचलणार का, याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

३१ खून, १०२ बलात्काराच्या घटना

यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यात खुनाच्या तब्बल ३१ तर प्राणघातक हल्याळभच्या ४६ घटना घडल्या आहेत. बलात्काराच्या १०२ घटना घडल्या असून लुटमार आणि दरोड्यांच्या घटनांतही वाढ झाली आहे. शहरातील विविध स्वयंसेवी संस्था तसेच यवतमाळ चेंबर ऑफ कॉमर्स आणि एमआयडीसी असोसिएशनने पोलीस अधीक्षकांची शिष्टमंडळासह भेट घेउन वाढती गुहेगारी रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली तर खासदार देशमुख यांनीही हा विषय थेट लोकसभेत मांडला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government should take measures to control the crime of yavatmal says sanjay deshmukh nrp 78 mrj