नागपूर: उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एका महिलेवर मध्य भारतातील शासकीय रुग्णालयातील पहिली सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. या शस्त्रक्रियेमुळे मांडीच्या हाडाच्या कर्करोगापासून महिलेची मुक्तता झाली. या शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीबाबत आपण जाणून घेऊ या.
आशा गोविंद चूनभुके (३०) रा. जि. वाशीम असे महिलेचे नाव आहे. आशा ही शेतमजूर आहे. शेतकामादरम्यान पडून त्यांच्या पायाचे हाड मोडले. कुटुंबियांनी तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलवले. तेथून तिला नागपुरातील मेडिकल रुग्णालयात पाठवले गेले. मेडिकलच्या अस्थिरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुमेध चौधरी यांनी तातडीने रुग्णाला दाखल करत विविध तपासणी केल्या.
तिला मांडीच्या हाडाचा जायंट सेल ट्यूमर (अस्थी कर्करोग) हा दुर्मीळ आजार असल्याचे निदान झाले. कर्करोगाने हाड ठिसूळ होऊन मोडले होते. या कर्करोगात ट्यूमर काढून मेगाप्रोस्थेसिस ही अत्यंत गुंतागुंतीची नाजूक शस्त्रक्रिया हाच एकमात्र उपाय होता. परंतु या प्रक्रियेसाठी लागणारा कृत्रिम सांधा महाग होता. त्यामुळे मेडिकलमधील अस्थिव्यंगोपचार विभाग, महात्मा फुले जनआरोग्य योजना व मेडिकल प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली. काही दिवसातच महिला रुग्ण परत आपल्या पायावर उभी झाली. या रोगाचे योग्य निदान व उपचार झाले नसते तर रुग्णास पाय गमवावा लागण्याचा धोका होता. ही शस्त्रक्रिया अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुमेध चौधरी यांच्या मार्गदर्शनात डॉ. पृथ्वीराज निस्ताने, डॉ. नीलेश साखरकर, डॉ. कौस्तुभ काल्मे, डॉ. अभिनव जोगानी यांनी केली. शस्त्रक्रियेमध्ये बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. उमेश रमतानी, डॉ. विद्या कारिमोरे, परिचारिका मोहनकर, गणवीर यांनी भूमिका वठवली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे प्रभारी डॉ. विजय मोहबिया व डॉ. संजीव मेढा यांनी आवश्यक महागडे वैद्यकीय साहित्य व औषधांसाठी मदत केली.
डॉक्टर काय म्हणतात…
मध्य भारतातील पहिली सांधा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणारे मेडिकल हे पहिले रुग्णालय ठरले आहे, अशी माहिती मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.
नातेवाईक काय म्हणतात?
यवतमाळहून नागपुरात एका खासगी रुग्णालयात आणले तेव्हा सुमारे १० लाखांचा अपेक्षित खर्च सांगण्यात आला. आर्थिक क्षमता नसल्याने मेडिकलला आलो. यशस्वी उपचाराने रुग्ण महिला पुन्हा आपल्या पायावर उभी झाली असून कर्करोगमुक्त झाली आहे, अशी माहिती नातेवाईक धनराज पडवाल यांनी दिली.