अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर : सुतारकामात निष्णात असलेल्या राज्यभरातील कैद्यांनी गेल्या वर्षभरात विविध वस्तू तयार केल्या. याद्वारे मध्यवर्ती कारागृह विभागाने २ कोटी ३० लाखांचा व्यवसाय केला.

कैद्यांमधील नकारात्मक भावना दूर करणे आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना शिक्षण- प्रशिक्षण देण्यात येते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक कारागृहात लाकडावर कलाकुसरीचे काम, टेबल-खुर्च्या आणि वेगवेगळय़ा वस्तू बनवण्यासाठी मोठा कारखाना उभारण्यात आला आहे. या वस्तूंना बाजारात मोठी मागणी आहे.

दरम्यान, सुतारकामात निष्णात असलेल्या कैद्यांनी गेल्या चार वर्षांत १५ कोटींपेक्षा किमतीच्या वस्तू तयार केल्या आहेत. २०१९ आणि २०२० मध्ये तर ११ कोटींपेक्षा जास्त उत्पादन करून विक्रम केला. या वर्षी २०२२ मध्ये सुतारकामातून दोन कोटी ३० लाखांचे उत्पादने तयार केली, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली.

१० कोटींचा विक्रमी नफा..

गेल्या चार वर्षांत कैद्यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनाचा विचार केल्यास २०१९-२० मध्ये राज्य कारागृह प्रशासनातील कैद्यांनी २४ कोटी ४४ लाखांची उत्पादने तयार केली. त्यात १० कोटी ७० लाखांचा विक्रमी नफा झाला.

शेतीही फुलवली..

राज्यातील कारागृहात उद्योगधंद्याबरोबर शेतीसुद्धा केली जाते. राज्यातील कारागृहात ८६० हेक्टर जमीन असून त्यापैकी ३४२ हेक्टरवर शेती पिकवली जाते. कारागृहात दर्जेदार आणि सेंद्रिय शेती केल्या जाते. या शेतीमध्ये प्रामुख्याने तांदूळ, गहू, ज्वारी, कडधान्य, सोयाबीन, ऊस, फळबागा, फुले आणि भाजीपाला पिकवला जातो. राज्यभरातील कारागृहातील शेतमालाला बाजारात मोठी मागणी असते.

कैद्यांमधील कलागुणांना कारागृह प्रशासन नेहमी प्रोत्साहन देते. कुशल आणि प्रशिक्षित कैद्यांकडून कलाकुसरीचे काम करून घेण्यात येते. तसेच काही कैदी शेतीची कामे करतात. शिक्षा भोगून बाहेर गेल्यानंतर समाजात त्यांना सन्मानाने जगण्यासाठी हातभार लागावा हा उद्देश आहे.

अनुप कुमरे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, नागपूर