नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह कुटुंबीयांवर विविध बँकांचे सहा कोटी २२ लाख ३० हजार १७४ रुपये कर्ज आहे. गडकरी यांच्या नावावर १ कोटी ६६ लाख ८२ हजार ७५० रुपयांचे तर पत्नीच्या नावे ३८ लाख ८ हजार ३९० रुपये आणि ४ कोटी १७ लाख ३९ हजार ३४ रुपये एवढे कर्ज आहे. गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात २८ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांत १० कोटींनी वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडकरींनी २०१९ मध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता १८ कोटी रुपये दाखवली होती. आता ती २८ कोटी ३ लाख १७ हजार ३२१ रुपये एवढी झाली आहे. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे १ कोटी ३२ लाख ९० हजार ६०५ रुपये, पत्नीकडे १ कोटी २४ लाख ८६ हजार ४४१ रुपये आणि कुटुंबाकडे ९५ लाख ४६ हजार २७५ रुपये अशी एकूण ३ कोटी ५३ लाख २३ हजार ३२१ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. एकूण स्थावर मालमत्ता २४ कोटी ४९ लाख ९४ हजार रुपयांची आहे. यापैकी स्वत: गडकरी यांच्या नावावर ४ कोटी ९५ लाख एवढी मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर ७ कोटी ९९ लाख ८३ हजार रुपयांची आणि कुटुंबाकडे ११ कोटी ५५ लाख ११ हजार रुपयांची मालमत्ता आहे.

हेही वाचा : तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

गडकरींची धापेवाडा येथे शेतजमीन आहे. त्यापैकी १५ एकर त्यांच्या पत्नीच्या नावावर आणि १४.६० एकर कुटुंबाच्या मालकीची आहे. महाल येथे पत्नी आणि कुटुंबाचे ५१ कोटी ४१ लाखांचे वडिलोपार्जित घर आहे. तसेच गडकरींच्या नावाने वरळी मुंबईत सदनिका आहे. त्यांनी बचत योजना, म्युच्युअल फंड, बाँड आणि शेअर्समध्ये ३ लाख ५५ हजार ५१० रुपये गुंतवले आहेत. त्यांच्या विविध बँकेतील खात्यांमध्ये ४९ लाख ६ हजार ५८६ रुपये आहेत. तसेच त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात १६, लाख ३, हजार ७१४ रुपये आहेत. गडकरी यांच्याकडे सहा वाहन आहेत. त्यापैकी तीन त्यांच्या पत्नीच्या नावावर आणि तीन त्यांच्या नावावर आहेत. गडकरी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध दहा फौजदारी प्रकरणे प्रलंबित असल्याचे नमूद आहे. विविध न्यायालयात ही प्रकरणे सुरू आहेत. त्यांच्याविरुद्ध आजवर एकाही प्रकरणात दोष सिद्ध झालेला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central minister nitin gadkari having wealth of rupees 28 crore and loan of rupees 6 crore rbt 74 css