नागपूर : भारतीय जनता पक्षाचे गट नेतेपदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित होताच शहरासह विदर्भातील विविध जिल्ह्यात जल्लोष केला जात असताना अनेक मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड होताच त्यांचे ट्विटरच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करत गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यकाळात राज्यात विकासाला गती येईल यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. गंगाधरराव फडणवीस यांच्यासोबत भाजपच्या कार्यालयात येणारा देवेंद्र फडणवीस राज्याचा पुन्हा मुख्यमंत्री होत असल्यामुळे आम्हाला जास्त आनंद आहे. संघाचा स्वयंसेवक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा, नगरसेवक, महापौर, आमदार , मुख्यमंत्री अशी सर्व कारकीर्द त्यांची बघितली आहे. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री निवडीचा आनंद असल्याचे आनंदराव ठवरे म्हणाले.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या मुख्यमंत्री निवड होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शहरातील धंंतोलीतील भाजपच्या कार्यालयासमोर ढोल ताशांच्या निनादात शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोश करण्यात आला. धंतोली आणि गणेशपेठ येथील भाजप कार्यालयात पेढे वाटण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारे फलक शहरातील विविध भागात लावण्यात आले आहे. नागपुरातील धरमपेठेतील त्यांच्या निवासस्थानी आणि धंतोलीतील भाजप कार्यालयाच्या समोर भाजपच्या कार्यकर्त्यानी ढोल ताशांच्या निनादात आणि फटाक्याची आतषबाजी करत जल्लोश केला.
देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है. भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. निवासस्थानासमोर जल्लोश केल्यानंतर धंतोलीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर भारतीय जनता युवा मोर्चा आणि महिला आघाडीने जल्लोष केला. याठिकाणी ढोल ताशांच्या निनादात आणि फटाक्याची आतषबाजी करत गुलाल उधळण्यात आला. फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदार संघात प्रतापनगर चौक आणि लक्ष्मीनगर भागात तर महालातील बडकस चौक परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव निश्चित झाल्यानंतर उद्या गुरुवारी होणाऱ्या नव्या महायुती सरकारचा शपथविधी समारंभ मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून त्यासाठी नागपूरमधून मंगळवारी खासगी आणि रेल्वेने ५०० पेक्षा अधिक कार्यकर्ते नागपूरवरुन रवाना झाले आहे.