नागपूर : अंबाझरीतील पुलाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले. यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका, नागपूर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने व्हीएनआयटीतील एक रस्ता सुरू केला. मात्र, या रस्त्यावरून जाण्यासाठी वेळेचे बंधन असल्याने वाहतूक कोंडी काही कमी झालेली नाही. गांधीनगर ते अभ्यंकर नगर या पर्यायी रस्त्यावर प्रचंड गर्दी होत असल्याने वाहनधारकांची पंचाईत होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबाझरी तलावाजवळील पुलाच्या बांधकामामुळे गेल्या दीड महिन्यापासून तेथील रस्ता बंद आहे. त्यामुळे अंबाझरी परिसरातील पर्यायी रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शेवटी उच्च न्यायालयाने व्हीएनआयटीच्या परिसरातील रस्ता सुरू करण्याबाबत प्रशासनला सुचवले. त्यानंतरही व्हीएनआयटीनेही हेकेखोर धोरण कायम ठेवत फक्त सकाळी आणि सायंकाळी केवळ दोन-दोन तासासाठी आणि फक्त दुचाकींकरिता रस्ता सुरू केला. यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्याच्या दृष्टीने काहीच फायदा झाला नाही.

हेही वाचा : गोंदिया: वाघ, बिबट्यांची दहशत कायमच…त्यात पुन्हा गावात हत्ती शिरल्याने…

जड वाहतूक सुरूच

अंबाझरी परिसरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला होता. मात्र, अजूनही लक्ष्मीनगर ते आयटी पार्क चौकापर्यंत ट्रक, टिप्पर, टँकर, ट्रॅक्टर अशी मालवाहू वाहने सर्रास धावत आहेत. जड वाहतुकीमुळे कोंडीत भर पडत आहे. वाहतूक पोलीस मात्र हातावर हात ठेवून हा सर्व प्रकार बघत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

बांधकाम साहित्य रस्त्यावरच

आयटी पार्क चौक ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत जवळपास ५ ते ६ बहुमजली इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या इमारतींच्या बांधकामासाठीचे साहित्य रस्त्याच्या कडेला टाकले जाते. ते वाहतुकीस अडचणीचे ठरत आहे. बांधकाम मजूरही रस्त्याच्या कडेलाच काम करीत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

हेही वाचा : एका प्रशिक्षणासाठी २७६ कोटींचे कंत्राट! एकाच संस्थेला २३ हजार जागांच्या मंजुरीवर प्रश्नचिन्ह

खाद्यपदार्थाच्या दुकानांमुळे अडचणीत भर

आयटी पार्क ते माटे चौक तसेच अभ्यंकरनगर चौक ते यशवंतनगर चौकादरम्यान खाद्यपदार्थाची दुकाने आहेत. मक्याचे कणीस आणि ज्यूस विक्रेत्यांनीही रस्त्यावरच ठाण मांडले आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलीस केवळ काही रुपयांसाठी या दुकानांना स्वरक्षण देत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central minister nitin gadkari s nagpur city resident facing traffic jam issue adk 83 css