नागपूर: देशात करोना, दंगली, लढायांहून अधिक मृत्यू हे अपघाताने होत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. सडक सुरक्षा अभियानांतर्गत नागपुरातील वनामती येथे आयोजित कार्यक्रमात अभिनेते अनुपम खेर यांनी गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली. सुरुवातीलाच अनुपम खेर यांनी देशभर महामार्गांचे जाळे विणण्याचे मोठे काम गडकरी यांनी केल्याचा उल्लेख केला. अपघातांमध्ये मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे गडकरी म्हणाले. ‘करोनामध्ये, युद्धामध्ये किंवा एखाद्या दंगलीत जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसेल तेवढे मृत्यू दरवर्षी रस्ते अपघातामध्ये होतात. याची मला खंत वाटते. रस्ते अपघात रोखायचे असतील तर अचूक निर्माणकार्य आणि समाजजागृती दोन्हींची आवश्यकता आहे. जनजागृतीचे कार्य शालेय स्तरापासूनच व्हायला हवे,’ असे गडकरी म्हणाले.

सुरुवातीला अनुपम खेर म्हणाले, देशात रोज अपघातात ४७४ जणांचा मृत्यू होतो. त्यावर गडकरी म्हणाले, देशात होणाऱ्या एकूण मृत्यूमध्ये १८ ते ३४ वयोगटातील ६६ टक्के जणांचा समावेश आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड ठोठावला. कायदे कडक केले, तरीही रस्ते अपघातातील मृत्यू थांबलेले नाहीत. मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत आपण यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण घेण्याच्या वयात मुलांवर चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडला तर तो कायमस्वरुपी राहतो, असेही गडकरी म्हणाले.

हेही वाचा : शासकीय नोकरी घोटाळा : बुलढाण्यात बनावट मंत्रालयीन शिक्के, नियुक्तीपत्रे अन् बरेच काही…

अपघातांचे कारण…

नितीन गडकरी म्हणाले, देशात आणखी उत्तम रस्ते तयार होतील. पण लोकांना शिस्त नसेल तर या रस्त्यांचा काहीही उपयोग नाही. सिग्नल तोडणे, लेन तोडून निघून जाणे, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालणे, हेल्मेट न लावणे, सिटबेल्ट न बांधणे अशा कितीतरी चुका लोक करतात. आपली आई, पत्नी, मुले घरी वाट बघत असतील, हे ध्यानात ठेवून गाडी चालवावी. कारण वर्षभरात होणाऱ्या अपघतांमध्ये जे मृत्यू होतात, त्यात १८ ते ३४ वर्ष वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहे. एखाद्या घरातील तरुण अचानक निघून जातो, तेव्हा त्या कुटुंबावर कोसळणाऱ्या संकटाची आपण कल्पनाही करू शकत नाही, अशी भावनाही गडकरी यांनी व्यक्त केली.

अधिकाऱ्यांनाही अधिकार

आमच्या मंत्रालयाने अधिकाऱ्यांनाही काही अधिकार दिले आहेत. त्यानुसार अपघाताचे कारण बघून तातडीने त्यावर उपाय करणे शक्य होणार आहे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

Story img Loader