नागपूर : मला मत दिले तरी ठीक किंवा नाही दिले तरी ठीक. मी सर्वांसाठी काम करीतच राहणार. खासदार कोणीही असो त्याने लोकांची कामे केलीच पाहिजेत , असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी नागपूर येथील सौंदर्यीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनाच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
शहराचा विकास करताना मी काम करणाऱ्यांच्या मागे असतो. जे काम करत नाहीत त्यांना त्यांची चूक दाखवत ठोकण्याचे काम करतो. जे काम हाती घेतले आहे ते काम चांगले झालेच पाहिजे असा माझा आग्रह असतो. ताजबागमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे. येथे रुग्णालय उभे करायचे आहे. अनेक लोक येथे बाहेरून येतात त्यांना चांगली आरोग्य सुविधा द्यायची आहे असेही गडकरी म्हणाले. राजकारण हा पैसे कमविण्याचा धंदा नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना ईश्वर सर्वकाही देत असतो. आपली फक्त त्यावर श्रद्धा असायला हवी. ताजुद्दीनबाबा कुठल्याही एक धर्माचे नाहीत ते सगळ्यांचे आहेत असे नितीन गडकरी म्हणाले. या ठिकाणी येणारा पैसा हा ताजुद्दीनबाबांचा आहे त्यामुळे येथे कुठलाही भ्रष्टाचार होता कामा नये असे नितीन गडकरी म्हणाले.