नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी स्पष्ट व बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नागपुरातील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेतील (एम्स) शनिवारी (२९ मार्च २०२५) झालेल्या दीक्षांत समारंभातही त्यांनी आपले बेधडक मत व्यक्त केले. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, जागतिक आनंद निर्देशांकात भारत ११८ व्या स्थानी आहे. पाकिस्तानसह इतरही देशाच्या क्रमांकावर त्यांनी भाष्य केले.
एम्समधील दीक्षांत समारंभाला प्रामुख्याने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. साधाकृष्णण, एम्सचे अध्यक्ष डॉ. अंद पंधारे, एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी, खासदार श्याम बर्वे आणि इतरही लोकप्रतिनिधी व एम्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले, सध्या हॅपी ह्युमन इंडेक्सची चर्चा सर्वत्र आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेल बिईंग रिसर्च सेंटरने जागतिक आनंद निर्देशांकाचे सर्व्हेक्षण केले. त्यात १४७ देशांचा सूक्ष्म अभ्यास केला गेला. त्यात फिनलॅन्ड हा देश आनंदी देशात पहिल्या क्रमांकावर आला. भारताचा ११८ वा क्रमांक असून पाकिस्तानचा क्रमांक १०९ वा होता.
ऑक्सर्फर्ड विद्यापीठाने ही क्रमवारी देतांना सर्व देशातील सामाजिक, आर्थिक, आरोग्य, उदारता, भ्रष्टाचाराची धारणा, जीडीपी, आनंद जिवन, कला, संस्कृती, वेळेचे व्यवस्थापनासह इतरही अनेक गोष्टी बघितल्या. त्यात आरोग्य हा सर्वात महत्वाचा घटक होता. नागपुरात सुरू झालेल्या पशु व मत्स विद्यापीठामुळे येथे या क्षेत्राला चालना मिळत आहे. या विद्यापीठानंतर येथे मदर डेअरी आली. या डेअरीच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन दिवसाला ५० लाख लिटरपर्यंत नेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. येथील पशुंचा दर्जा सुधारण्यावर संशोधन सुरू आहे. पशु व मत्ससोबतच आरोग्यावरही चांगले काम एम्समुळे सुरू आहे. येथील संशोधन व अभ्यासाच्या जोरावर आरोग्य क्षेत्राचेही रुप पालटणे शक्य आहे. त्यातून भारताचाही क्रम सुधारेल. भारतातील डॉक्टर व साॅफ्टवेअर अभियंत्यांना जगभरात मान्यता असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रात खासगी, सार्वजनिक भागिदारी तत्वावरही चांगले काम शक्य असल्याचे सांगत माझ्याकडे बंदर खात्याची जबाबदारी असतांना मी तेथील वैद्यकीय महाविद्यालयात त्याबाबतचा प्रयोग करून आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनाही त्याची माहिती दिली होती, असेही गडकरी यांनी सांगितले.
समस्या समजून एम्सने विकास आराखडा तयार करावा
एम्समध्ये सध्या चांगले काम होत आहे. येथे काही अवयव प्रत्यारोपण सुरू झाले असून जे नाही ते सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहे. एम्सने नागपूरसह विदर्भातील आरोग्याच्या समस्या समजून भविष्याच्या विकासासाठीचा आराखडा तयार करावा. जेणेकरून सामान्यांना लाभ होईल, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.