नागपूर: रविवारी भाजपचा स्थापना दिवस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरच्या महाल स्थित भाजपा कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही कान टोचले. मी माझ्या काळात जी चूक केली ती तुम्ही करू नका असे सांगत पक्षाला एक प्रकारे आरसा दाखवण्याचे काम केले.

नितीन गडकरी म्हणाले की, भाजपचे कार्यालय उभे करण्यासाठी अनेक लोकांनी कष्ट केले. माजी आमदार गिरीश व्यास यांचेही यासाठी मोठे परिश्रम आहे. दरम्यान गडकरींनी सांगितले की, भाजपच्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये हिंदू महासभा आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय होते. भाजपचे कार्यालय उभे करण्यासाठी आम्ही कम्युनिस्ट पक्ष आणि हिंदू महासभा या दोघांचेही कार्यालये विकत घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या इतक्या वर्षाच्या इतिहासाला उजाळा दिला. एका काळात कार्यालयाचे भाडे देण्यासाठीही पैसे नव्हते. तेव्हा घरमालक ढवळे हे भाजपचे लोक भाड्याचे पैसे देत नाही म्हणून महालच्या संघ कार्यालयात तक्रार घेऊन गेले होते असेही गडकरींनी सांगितले.

गडकरी नेमकं बावनकुळे यांना काय म्हणाले

गडकरी म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा आपला परिवार आहे. येथील प्रत्येक कार्यकर्ता हा ‘परिवारा’चा सदस्य आहे. पक्षाच्या प्रत्येकाने आपल्या मुलांवर प्रेम करावे. मुलांना तिकीट मिळावे म्हणून ते प्रयत्नही करतात परंतु, आपला कार्यकर्ता हा सुद्धा आपल्या परिवाराचा एक सदस्य आहे. याप्रमाणे त्याच्यावर प्रेम करा, असा सल्ला गडकरींनी दिला. भाजपा हा जातीयवादी किंवा संप्रदायिक पक्ष नाही. त्यामुळे पक्षांमध्ये विविध जातींची सेल उभे करणे हे चूक आहे. मी माझ्या काळात ही चूक केली होती. पण आता मला ते लक्षात आलेले आहे. यातून कुठलीही जात आपल्या सोबत जोडली जात नाही. जातीय सेलचे जे अध्यक्ष असतात त्यांना त्याच्या जातीत कोणीही विचारणारा नसतो. महापालिका निवडणूक आली की, जाती सेलचे अनेक पत्र तिकिटासाठी बावनकुळेकडे येतील. त्यावेळी त्यांना जाती सेल तयार करणे किती मोठी चूक होती हे कडून चुकेल असे गडकरी म्हणाले.