नागपूर : पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी ‘मारबत आणि बडग्याचा उत्सव’ असतो. या दिवशी शहरात मारबतीची मिरवणूक काढत समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. मध्य नागपुरात जागनाथ बुधवारी परिसरात मारबत उत्सवाला प्रारंभ करण्यात आला असून पिवळी मारबत ही आजपासून नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. राज्याची उपराजधानी नागपूर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर म्हटले की, आंबटगोड संत्री, वऱ्हाडी पाहुणचार, झणझणीत सावजी जेवण आणि हिवाळी अधिवेशन अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण, या व्यतिरिक्तही नागपूर एका खास गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी ‘मारबत’ची मिरवणूक. १३९ वर्षाचा इतिहास असलेली तेली समाजातर्फे काढण्यात येणारी पिवळी मारबती आजपासून नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या पिवळी मारबत उत्सवाच्या ठिकाणी भेट देऊन मारबतीची पूजा करणार आहे. या मारबत बडग्या उत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि स्थानिक समस्या यावर भाष्य करणारे फलक असतात. ही परंपरा १८८१ पासून सुरु झाली.

हेही वाचा : संविधानात दुरूस्‍ती केल्‍याशिवाय ‘इंडिया’ हटवता येणार नाही

तान्हा पोळ्याच्या दिवशी ‘मारबत आणि बडग्या’ हा जगातील एकमेव असा मिरवणूक प्रकार महाराष्ट्रात केवळ नागपुरातच आहे. ‘घेऊन जा ऽऽ गे मारबत’, अशी घोषणा देत ही मिरवणूक काढली जाते. तऱ्हाने तेली समाजाचे अध्यक्ष प्रकाश गौरकर यांनी सांगितले, देशात इंग्रजांच्या जुल्मी शासनाविरोधात स्वातंत्र्य लढाईच्या आंदोलनात विदर्भातील तऱ्हाने तेली समाजाचा मोठा सहभाग होता. ब्रिटिश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. त्यावेळी देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली होती. इंग्रज शासनाच्या अत्याचारास जनता कंटाळल्याने आणि त्यांच्या दडपशाहीच्या व अत्याचाराच्या विरोधात पिवळी मारबतीला सुरुवात झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central minister nitin gadkari will perform pooja at marbat festival in nagpur vmb 67 css
Show comments