बुलढाणा : आखाती देशात स्थायिक झालेल्या मराठी लोकांना एकत्र येऊन सामाजिक कार्यक्रम साजरी करता यावा यासाठी दुबईत महाराष्ट्र सदन उभारण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अबुधाबी येथे दिली.
आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून दुबईतील अबुधाबी येथे शिवजयंती उत्सव सोहळा पार पडला. इन्स्पायर इव्हेंट अँड प्रमोशन व भारतीय स्थानिक रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस फेब्रुवारीला बीएपीएस हिंदू मंदिर अबुधाबी येथे शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मालोजी राजे शाहू छत्रपती, खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. यावेळी बोलताना नामदार जाधव यांनी वरील घोषणा वजा ग्वाही दिली. या घोषणेचे उपस्थित मराठी बांधव आणि भगिनी यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात आणि टाळ्यांच्या कडकडाडात स्वागत केले.
जाधव म्हणाले, या कार्यक्रमाला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सुद्धा येणार होते. त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे त्यांना येता आले नाही. मात्र, त्यांनी मला या कार्यक्रमाला आवर्जून जावं अस सांगितले. दुबईमध्ये आणि दूरवरच्या देशात शिवजयंती साजरी होते, हे महाराष्ट्र, मराठी बांधव यांच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा गौरवशाली असून आजच्या पिढीलाही प्रेरणा आणि स्फूर्ती देणारा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजवटीमध्ये लोकांच्या हिताची कामे केली. त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करुन सामान्यांना न्याय दिला, त्यांचे हित जोपसण्याचे काम केल्याचे मंत्री म्हणाले. यावेळी नामदार जाधव यांनी अबुधाबी येथील मराठी माणसांसोबत मनमोकळा संवाद साधला. या कार्यक्रमाला अबुधाबी येथील मराठी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.