नागपूर : रेल्वे तिकीट तपासणींचे काम प्रवाशांचे तिकीट बघून त्यांचे आसन मिळून देणे, प्रवासादरम्यान काही अडचण असल्याचे मदत करणे आहे आणि तिकीट नसलेल्यांना दंड करणे हे आहे. परंतु अलिकडे रेल्वेने टीटीईंचे पथक तयार करून वेगवेगळ्या गाड्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तिकीट तपासणी मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत २०२४-२५ या आर्थिक वर्षांत २८ कोटी १६ लाख ३३ हजार ६६३ इतके विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. तिकीटविना आणि अनियमित (सर्वसाधारण तिकीट घेऊन शयनयान श्रेणीतून प्रवास) प्रवास करण्याविरुद्ध ही कारवाई ही कमाई  करण्यात आली.  

तिकीट तपासणी मोहीमेदरम्यान ४ लाख ७४ हजार ४१२ अनियमित प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यातून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळाला. यामध्ये २ लाख ५७ हजार २५ प्रकरणे विनातिकीट प्रवासाची असून त्यातून १०.२८ कोटी अतिरिक्त भाडे आणि ६.८८ कोटी अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात आले. २,१२,६९८ अनियमित प्रवास प्रकरणांतून ५.४७ कोटी अतिरिक्त भाडे आणि ५.४२ कोटी अतिरिक्त शुल्क जमा झाले. तसेच, ४.६८९  विनाबुकिंग सामान प्रकरणांमध्ये ८.६० लाख अतिरिक्त भाडे आणि ४.७४ लाख अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात आले.

 या मोहीमेत कमलेश केशव (वरिष्ठ तिकीट परीक्षक, आमला) यांनी ६,७१९ प्रकरणे शोधून ४२.५२ लाख महसूल मिळवला. आलोक झा (मुख्य तिकीट परीक्षक, नागपूर) यांनी ६.०४९ प्रकरणे शोधून ४०.५८ लाख, तर श्री मुखराम मीना (वरिष्ठ तिकीट परीक्षक, आमला) यांनी ६,६५३ प्रकरणे शोधून  ३८.८१ लाख इतका महसूल मिळवला.

प्रवाशांनी हे ध्यानात घ्यावे

रेल्वे प्रशासन सर्व प्रवाशांना वैध तिकीटासह प्रवास करण्याचे आणि आरक्षित डब्यांत विनातिकीट प्रवेश टाळण्याचे आवाहन करते. ज्या प्रवाशांचे पूर्णपणे प्रतीक्षा यादी (फुल वेटलिस्ट) असलेले पीआरएस तिकीट आहे, त्यांनी प्रवासाच्या ३० मिनिटे आधी पीआरएस काउंटरवर जाऊन तिकीट रद्द करावे. जर त्या कालावधीत रद्द न केल्यास, ते अनारक्षित डब्यांमध्ये प्रवास करू शकतात. पूर्ण प्रतीक्षा यादीतील ई-तिकीट प्रवासासाठी वैध मानले जाणार नाही. आंशिक प्रमाणित (पार्टियली कंफर्म्ड) तिकीट असलेल्या प्रवाशांनी, ज्या प्रवाशांना कंफर्म तिकीट आहे ते आपापल्या श्रेणीत प्रवास करू शकतात, तर प्रतीक्षा यादीतील प्रवासी फक्त अनारक्षित डब्यांत प्रवास करू शकतात.