अकोला : भुसावळ रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसह अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेने आषाढ एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरसाठी विशेष गाडी सोडली. प्रथमच अकोला-पंढरपूर-अकोला विशेष गाडी सोडण्यात आली असून मंगळवारी सकाळी ११ वाजता ती रवाना झाली. यावेळी वारकऱ्यांकडून ‘जय हरी विठ्ठल’चा एकच गजर करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला-पंढरपूर-अकोला विशेष गाडी क्रमांक ०७५०५ अकोला रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक सहावर लागली होती. यावेळी खासदार अनुप धोत्रे, भाजप प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. चालक व गार्ड यांचा सत्कार करण्यात आला. विशेष गाडीला हिरवी झेंडी दाखवल्यावर ती पंढरपूरकडे रवाना झाली. ही गाडी उद्या सकाळी १०.५० वाजता पंढरपूर येथे पोहचणार आहे. विशेष गाडी क्रमांक ०७५०६ चा परतीचा प्रवास पंढरपूर येथून १७ जुलै रोजी रात्री ९ वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता ती अकोला येथे पोहचेल. या गाडीला वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तपुर, वाडी, कलबुरगी, सोलापूर, कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर थांबा आहे. या गाडीमुळे अकोल्यावरून थेट पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठी सुविधा झाली आहे.

हेही वाचा >>> चंद्रपुरकरांची दहा वर्षांत ५५० कोटींनी फसवणूक; चिटफंड कंपन्यांनी…

बार्शिटाकळी तालुक्यात मुसळधार पाऊस

बार्शिटाकळी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे काही मार्ग देखील बंद झाले होते. पावसाचे पाणी लोकांच्या घरामध्ये देखील शिरले. पावसाने चांगलाच जोर पकडल्याने अकोला ते बार्शिटाकळी मार्ग काही काळासाठी बंद झाला होता. बार्शिटाकळी ते सिंदखेड मार्गे शहापूर नाल्यावरुन पाणी असल्याने हा मार्ग देखील बंद होता. पाण्याची पातळी काही प्रमाणात कमी झाल्याने हे मार्ग सुरू झाले. कान्हेरी सरप जवळील विद्रूपा नदीला पूर आला. पुलावरून पाणी वाहन आहे. सद्यस्थितीत रिमझिम पाऊस सुरू आहे.

हेही वाचा >>> बावनकुळे म्हणाले “मुले कोणाची…बारसे कोण करतय…”

अप्राप्त हप्त्याच्या प्रश्नावर शिक्षकांना दिलासा

वेतन आयोगाचे अप्राप्त हप्ते शिक्षकांना मिळणार असून यासंदर्भातील आदेश शिक्षण संचालकांनी काढला आहे. या प्रश्नासाठी विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बोर्डे यांनी पाठपुरावा केला. राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. शिक्षकांसाठीचा आदेश अप्राप्त होता. यापूर्वीचे एक ते चार हप्ते राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आले. मात्र, अमरावती विभागातील काही शिक्षक या लाभांपासून वंचित होते. २० जूनच्या शासन आदेशामध्ये केवळ पाचवा हप्ता अदा करण्याचे निर्देश होते. वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करताना त्या आदेशामध्ये ज्या शिक्षकांच्या यापूर्वीचे तिसरा व चौथा हप्ता अप्राप्त आहे, अशा शिक्षकांना तो अदा करण्याचे निर्देश सुद्धा पत्रामध्ये देण्यात यावे, अशी मागणी डॉ. बोर्डे यांनी केली होती. संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार एक ते चार हप्त्यापैकी अदा करणे बाकी असल्यास तो हप्ता अदा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway run special train from akola to pandharpur on occasion of ashadhi ekadashi ppd 88 zws