शहरात गेल्या तीन दिवसांपासून मार्च हिट चांगलाच जाणवू लागला आहे. मात्र यातून थोडा दिलासा नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर प्रवाशांना मिळू लागला आहे. मध्य रेल्वेने यावर्षी पहिल्यांदाच ‘मिस्टिंग सिस्टम’ या अतिसूक्ष्म सिंचनासारखा पाण्याचा फवारा करून फलाटावर गारवा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातील तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसवर गेले आहे. मे आणि जूनमध्ये हे तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत जात असते. उन्हाळ्याच्या सुटय़ात प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. नागपूरच्या उन्हात मुला-बाळांना घेऊन प्रवास करणाऱ्यांचा जीव कासावीस होत असतो. नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाटावरील पंखे उष्ण वारा फेकत असल्याने चटके बसण्याचा अनेकांनी अनुभव घेतला आहे, परंतु यावर्षी एक ते तीन फलाटावर रेल्वेगाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना यापासून मुक्ती मिळाली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावरील तीन फलटावर ‘मिस्टिंग सिस्टम’ कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे रेल्वेगाडीतून उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांना थंड हवेची झुळूक अनुभवायला मिळत आहे. ज्या ठिकाणी गाडी फलाटावर उभी करण्यात येते, अगदी त्या भागात ‘मिस्टिंग सिस्टम’ बसवण्यात आले आहे. फलाट क्रमांक १ ते ३ वर इटारसी एन्ड ते मुंबई एन्डपर्यंत दोन्ही बाजूच्या पादचारी पुलांपर्यंत ही प्रणाली बसवण्यात आली आहे. शिवाय मुंबई एन्डला फलाट क्रमांकावरील नवनिर्मिती खुल्या प्रतीक्षालयात देखील ही प्रणाली बसवण्यात आली आहे.

फलाटाच्या छतापासून काही अंतरावर एक पाईप लावण्यात आली आहे. त्या पाईप लाईनवर विशिष्ट अंतरावर सूक्ष्म छिंद्र असलेली तोटी (नोझल) बसवण्यात आली आहे. तेथून पाण्याचा फवारा बाहेर पडतो आणि पाण्यात आद्र्रता निर्माण होते. त्यामुळे सुमारे ५ ते ६ अंश सेल्सिअसने तापमान कमी होते.

उन्हाळ्याच्या दिवसात आठ तास ही प्रणाली सतत सुरू राहिल्यास सुमारे ४ हजार लिटर पाण्याची आवश्यकता भासते. छताला लागून पाणी सोडणारी तोटी असल्याने वरच्यावर पाणी तापमानात मिसळून जाते. त्यामुळे प्रवाशांच्या अंगावर पाणी पडण्याचा किंवा टाईल्सवर पाणी पडण्याचा प्रश्नच येत नाही.

सूक्ष्म सिंचनाप्रमाणे अगदी छोटे पाण्याचे थेंब बाहेर येताच वातावरणातील तापमान शोषून घेतात. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन प्रवाशांना दिलासा मिळतो. सुमारे १२ लाख रुपये खर्चून ही प्रणाली बसवण्यात आली आहे, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले.

दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेने यापूर्वी रायपूर आणि गोंदिया येथे मिस्टिंग सिस्टीम बसवले होते. गेल्यावर्षी पाण्याचा दुष्काळ होता. त्यामुळे गोंदिया येथील मिस्टिंग सिस्टिम बंद ठेवण्यात आले होते. मध्य रेल्वेतील हा पहिलाच प्रयोग आहे. नागपुरात यशस्वी झाल्यानंतर इतर विभागात ते लावण्याबद्दल विचार केला जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मध्य रेल्वेचे मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर हे विभाग आहेत.

‘मिस्टिंग सिस्टम’ 

एक छोटा पाईप फलाटाच्या छताजवळ लावण्यात आला आहे. या पाईपला १.५ मीटर अंतरावर एक कॉपरची तोटी बसवण्यात आली आहे. त्या तोटीला सूक्ष्म छिंद्र आहेत. पाण्याच्या टाकीतून उच्चदाबाने पाईपमधून पाणी सोडण्यात येते. या दाबामुळे तोटीच्या सूक्ष्म छिंद्रामधून पाणी बाहेर पडते आणि पाण्याचे धुके निर्माण होते. वातावरणातील उच्च तापमानामुळे पाण्याचे धुके हवेत आद्र्रता निर्माण करते आणि गारवा निर्माण होतो. यामुळे नागपुरातील कडक उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा मिळत आहे.