अकोला : मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांना एलएचबी कोच लावले जाणार आहे. शिवाय सुधारित संरचनेसह गाडी चालवण्यात येणार आहे. महाराष्ट्र एक्सप्रेसला एलएचबी कोच लावले जाणार असल्याने प्रवास अधिक सुरक्षित होईल.

गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर – गोंदिया एक्सप्रेस ०१ जूनपासून कोल्हापूर रेल्वेस्थानकावरून एलएचबी कोच आणि सुधारित संरचनेसह चालेल. गाडी क्रमांक ११०४० गोंदिया – कोल्हापूर एक्सप्रेस ०३ जूनपासून गोंदिया रेल्वेस्थानकावरून एलएचबी कोच आणि सुधारित संरचनेसह चालेल. कोल्हापूर -गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसची सुधारित संरचना केली आहे. या गाडीची एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, सात शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार अशी संरचना राहील.

साप्ताहिक विशेष गाडीच्या कालावधीमध्ये वाढ

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता विशेष ट्रेनच्या परिचालन कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९०२५ बलसाड – दानापूर साप्ताहिक विशेष गाडी २३ जूनपर्यंत, गाडी क्रमांक ०९०२६ दानापूर – बलसाड साप्ताहिक विशेष गाडी ०१ जुलैपर्यंत, गाडी क्रमांक ०९०४५ उधना – पटना साप्ताहिक विशेष गाडी २७ जूनपर्यंत, गाडी क्रमांक ०९०४६ पटना – उधना साप्ताहिक विशेष गाडी २८ जूनपर्यंत, गाडी क्रमांक ०९५७५ राजकोट – मेहबूबनगर साप्ताहिक विशेष ३० जूनपर्यंत, गाडी क्रमांक ०९५७६ मेहबूबनगर – राजकोट साप्ताहिक विशेष ०१ जुलैपर्यंत, गाडी क्रमांक ०९१२९ बांद्रा टर्मिनस – रिवा अनारक्षित साप्ताहिक विशेष २६ जूनपर्यंत आणि गाडी क्रमांक ०९१३० रिवा – बांद्रा टर्मिनस अनारक्षित साप्ताहिक विशेष २७ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

या गाडीसाठी लागू असलेल्या अनारक्षित शुल्कासह अनारक्षित कोचसाठी तिकिटे यूटीएस ॲपद्वारे बुक करता येतील. या विशेष गाड्यांच्या वेळापत्रक, थांबे आणि संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या गाड्यांच्या थांबे व वेळांसाठी अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. उन्हाळा व सुट्टीच्या काळामुळे रेल्वे गाड्यांमध्ये सध्या गर्दीचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या विशेष गाड्यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विशेष गाड्यांमुळे गर्दीवर नियंत्रण राहण्यास मदत होईल.