अमरावती : सामान्य डब्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपाययोजना हाती घेतल्या असून लवकरच ३७ मेल / एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये ११७ अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत. दररोज सुमारे दहा हजार प्रवाशांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे.गेल्या जून-जुलै पासून रेल्वे गाड्यांमध्ये सामान्य श्रेणीचे डबे वाढविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. एकट्या नोव्हेंबर महिन्यात २६ रेल्वेगाड्यांमध्ये ८१ सामान्य डबे जोडण्यात आल्याने या कामाला गती मिळाली आहे.
आतापर्यंत भारतीय रेल्वेने एकूण ३८५ रेल्वेगाड्यांमध्ये ९५७ सामान्य डबे (एलडब्यूएस कोच) जोडले आहेत. प्रवाशांकडून सामान्य डब्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी १२ हजार सामान्य डबे तयार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून भारतीय रेल्वेने विशेष उत्पादन कार्यक्रम हाती घेतला. यापैकी ९०० डबे या आर्थिक वर्षात आधीच जोडल्या गेले आहेत. अनारक्षित श्रेणीतील प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी १० हजार सामान्य डबे उत्पादन करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती मध्ये रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली आहे.
हेही वाचा…बुलढाणा: ‘आधार’च्या मदतीने तेलंगणामधील नातेवाईकांचा शोध
ब
करोनाकाळात भारतीय रेल्वेने मेल / एक्स्प्रेस गाड्यांतील सामान्य डब्याची संख्या एक आणि दोन करण्यात आलेली होती. तसेच पूर्वी आयसीएफ कोचच्या मेल-एक्स्प्रेस गाड्या होत्या. त्यावेळी गाड्याच्या डब्यांची संख्या २४ होती. आता गाड्यांना एलएचबी कोच जोडल्याने गाड्यांच्या डब्यांची संख्या घटली. त्यामुळे रेल्वेने इतर श्रेणीच्या कोचऐवजी साधारण डब्यांची संख्या कमी केली होती. त्यामुळे साधारण डब्यांची संख्या वाढवण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. अलीकडेच रेल्वे बोर्डाने मेल-एक्स्प्रेस गाड्यांतील साधारण डब्यांची संख्या दोनऐवजी चार आणि सहा करण्यास मंजुरी दिली.
हेही वाचा…गोंदिया : आसाम वरून मुंबईला जाणारे सुपारीचे ट्रक बेपत्ता
गेल्या काही वर्षांत रेल्वेने सामान्य श्रेणीचे डबे कमी करण्यावर भर दिल्याने सामान्य प्रवासी नाराज झाले होते. अनारक्षित प्रवासाची मोठी अडचण निर्माण झाली होती. तातडीच्या कामासाठी प्रवास करावा लागतो, त्यावेळी आरक्षित तिकीट उपलब्ध होत नाही. त्यांना प्रतीक्षा यादीचे तिकीट काढून आरक्षित डब्यांमधून प्रवास करावा लागतो. काही जण उभे राहून किंवा मिळेल तिथे बसून लांबचा प्रवास करताना दिसतात. आता मध्य रेल्वेने सामान्य श्रेणीचे डबे वाढविण्यावर भर दिल्याने प्रवाशांना दिलासा मिळू शकणार आहे.