अकोला : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आदिलाबाद ते दादर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने अनारक्षित गाड्यांचे नियोजन केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रमुख मार्गावरून अनारक्षित गाड्या सोडणार आहे. अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आदिलाबाद ते दादर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमरावती अनारक्षित विशेष गाडीच्या दोन फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०१२१८ विशेष गाडी अमरावती येथून ५ डिसेंबर रोजी १७.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.२५ वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्र. ०१२१७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ७ डिसेंबर रोजी ००.४० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर येथे थांबे राहतील. सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डबे गाडीला राहणार आहेत.
हेही वाचा…सावधान! ‘डिजिटल अरेस्ट’ नव्या ‘सायबर फ्रॉड’चा धोका; अशी होते फसवणूक…
आदिलाबाद – दादर – आदिलाबाद अनारक्षित विशेष गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. विशेष गाडी क्रमांक ०७०५८ विशेष ट्रेन आदिलाबाद येथून ५ डिसेंबर रोजी सकाळी ०७.०० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०७०५७ दादर येथून दि. ७ डिसेंबर रोजी ०१.०५ वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे त्याच दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल. मध्य रेल्वे नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानही अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहेत.
हेही वाचा…‘लाडकी बहीण योजने’च्या वैधतेबाबत राज्य शासन गप्प, उच्च न्यायालयाकडून आता…
दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भुसावळ विभागातील काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.