लोकसत्ता टीम
अकोला : मध्य रेल्वे मार्ग कायम व्यस्त असतो. या रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे विभागात सुरू असलेल्या तांत्रिक कार्यामुळे विविध भागात ब्लॉग देखील घेण्यात आले होते. आता रेल्वेचे बहुतांश कार्य पूर्णत्वास गेले आहे.
भुसावळ विभागातील बोदवड – मलकापूर (१९.८१ किमी) खंडामध्ये स्वयंचलित सिग्नल प्रणाली १६ डिसेंबर रोजी कार्यान्वित झाली. या कामाला आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कार्य योजनेत पीएच-३३ अंतर्गत मंजुरी मिळाली होती. या कार्यासाठी चार दिवस ‘प्री-नॉन-इंटरलॉकिंग’ आणि एक दिवस ‘नॉन-इंटरलॉकिंग’ अशा पद्धतीने नियोजन केले होते. १२ ते १५ डिसेंबरदरम्यान ‘प्री-एनआय’ काम पूर्ण झाले.
आणखी वाचा-भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांची स्मृती मंदिर परिसरात दांडी..
१६ डिसेंबर रोजी १० तासांमध्ये काम पूर्ण करण्यात आले. बोदवड – खामखेड आणि खामखेड – मलकापूर स्वयंचलित विभागामध्ये रुपांतरित करण्यात आले. या भागात १७ स्वयंचलित सिग्नल आणि दोन ‘सेमीऑटोमॅटिक’ स्वयंचलित सिग्नल तसेच १५ स्वयंचलित सिग्नल आणि एक ‘सेमीऑटोमॅटिक’ स्वयंचलित सिग्नल बसवण्यात आले आहेत. यासह वरणगाव – अकोला विभागात आता ७६.४३ किमीचे स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ पूर्ण झाले.
बोदवड रेल्वेस्थानक आता पूर्णपणे स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ झाले आहे. ‘सिग्नलिंग’ मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने रेल्वे गाड्यांचे सुरक्षिततेमध्ये देखील वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या वरणगाव – अकोला विभागात ७६.४३ कि.मी. चे स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ करण्यात आले आहे. या भागातील बोदवड – मलकापूर खंडात स्वयंचलित सिग्नल प्रणाली (१९.८१ कि.मी.) यशस्वीपणे कार्यान्वित झाली. त्यामुळे आता दर एक कि.मी. भागामध्ये एक रेल्वे गाडी चालवणे शक्य होईल. गाड्यांचा खोळंबा टळण्यास मदत होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आणखी वाचा-नीलम गोऱ्हे राम शिंदेंना म्हणाल्या, “आता तुम्हाला मागच्या दाराने….”
रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार
स्वयंचलित सिग्नल प्रणालीमुळे भुसावळ – बडनेरा भागात रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार आहे. तसेच मार्ग क्षमता सुधारली जाईल. यामुळे गाड्यांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. दोन रेल्वेस्थानका दरम्यान प्रत्येक एक किमी अंतरावर सिग्नल बसवले गेले आहेत. त्यामुळे दर एक किमी भागामध्ये एक रेल्वे गाडी चालवणे शक्य होईल. यामुळे गाड्यांचा वेग वाढेल आणि गाड्यांचा खोळंबा कमी होईल. कमी वेळात जास्त गाड्या चालवता येणार आहे. प्रवासी रेल्वे गाड्या दिरंगाईने धावण्याचे प्रमाण घडणार आहे. यासोबतच मालवाहतूक रेल्वे गाड्यांचा वेग देखील वाढेल.