फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने मोहीम राबवली जात आहे. ऑगस्ट महिन्यात मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून तब्बल १६.८८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. आगामी काळातही रेल्वेकडून ही मोहीम सुरूच राहणार आहे. विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून उपनगरीय सेवा, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात येते.
हेही वाचा >>> चंद्रपूर : ४१ हजारांची लाच घेतांना दोन सरपंचासह एका उपसरपंच जाळ्यात
विनातिकीट प्रवास आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबविली जाते. एकट्या ऑगस्ट महिन्यात तपासणीदरम्यान तब्बल ३.१२ लाख प्रवासी विनातिकीट आढळून आले. त्यांच्याकडून १६.८८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये अशा मोहिमांतून मध्य रेल्वेने तब्बल १३२.१७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कालावधीत एकूण २०.०८ लाख प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले.
हेही वाचा >>> वाघाने जिल्हा सोडला पण डरकाळ्या सुरूच; शाळा ओस तर वन कर्मचारी त्रस्त
रेल्वेकडून सतत कारवाई केल्यानंतरही फुकट्या प्रवाशांवर कोणताही परिणाम होत नसल्याने ठिकठिकाणी तपासणी पथक तैनात करण्यात आले आहे. फुकट्याकंडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढत असले तरी फुकट्या प्रवाशांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. तिकीट तपासणीची जबाबदारी टीसींकडे असते. मात्र, मुळात टीसींच्या संख्या कमी आहे. त्यामुळे प्रत्येक टीसीच्या वाट्याला अतिरिक्त काम येते. याचा गैरफायदा फुकटे प्रवासी घेत असतात.