राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता
नागपूर : कोळसा, सिमेंट, पेट्रोल-डिझेल सोबतच वाहनांची वाहतूक वाढवून आपल्या उत्पन्नात भर घालण्याचा यशस्वी प्रयोग रेल्वेने केला आहे. गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेने एका लाखाहून अधिक विविध वाहनांसह एक हजार २० मोटारगाड्यांची वाहतूक केली आहे. त्यातून रेल्वेला १५९.१४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
मध्य रेल्वेने मुंबई, नागपूर, कोल्हापूर, पुणे आणि भुसावळ या विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट्स स्थापन केले आहेत. यामार्फत स्थानिक उद्योगांशी संपर्क साधून त्यांना रेल्वेने वाहतूक करण्यासाठी प्रेरित केले जाते. त्यासाठी अनेकदा सवलत दिली जाते. त्याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे चालू आर्थिक वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट होते.
आणखी वाचा-नागपूर: ५५३ पदे मंजूर असतानाही स्वच्छता निरीक्षक पदांचा समावेश नाही, विद्यार्थी आक्रमक
मध्य रेल्वेने २०२२-२३ या वर्षात एकूण १.२० लाख वाहनांची वाहतूक केली. यामध्ये १०२० मोटारगाड्यांचा समावेश आहे. या वाहतुकीतून रेल्वेला १५९.१४ कोटींचे उत्पन्न मिळाले. १ एप्रिल २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत ऑटोमोबाईल्सचे २६७ मालगाड्या (रेक) भरल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत २०० मालगाड्या ( रेक ) भरून पाठवण्यात आल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षांत वाहनांच्या वाहतुकीत ३३.५ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी (१ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२२) ३०.३२ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. यावर्षी हे उत्पन्न ४६.११ कोटी इतके आहे.
मुंबई विभागातील कळंबोली, नागपूर विभागातील अजनी, भुसावळ विभागातील नाशिक, सोलापूर विभागातील दौंड, विलाड आणि पुणे विभागातील खडकी, चिंचवड, मिरज आणि लोणी येथे वाहनांना चढ-उतार करण्याची व्यवस्था (गुड्स शेड)करण्यात आली आहे.
आणखी वाचा-भाजपच्या सत्ताकाळात ओबीसींचे सर्वाधिक नुकसान!मागासवर्गीयांच्या विविध संघटनांचा आरोप
पुणे विभाग १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२२ या कालावधीत १८९ मालगाड्या (रेक) भरून पहिल्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी याच कालावधीत म्हणजेच १ एप्रिल २०२२ ते २० जून २०२२ या कालावधीत १३० मालागाड्या (रेक) भरण्यात आल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर भुसावळ विभाग आहे. या कालावधीत या विभागातून ६९ मालगाड्या भरून पाठवण्यात आल्या. मागील वर्षी याच कालावधीत म्हणजेच १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२२ या कालावधीत ४९ मालगाड्या पाठवण्यात आल्या होत्या. नागपूर विभागाने या कालावधीत केवळ चार मालगाड्या भरल्या आहेत, अशी मध्य रेल्वेकडून प्राप्त झाली आहे.
३३.५ टक्क्यांनी वाढली वाहनांची वाहतूक
मध्य रेल्वेने १ एप्रिल २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत ऑटोमोबाईल्सचे २६७ मालगाड्या (रेक) भरल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत २०० मालगाड्या ( रेक ) भरून पाठवण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षांत वाहनांच्या वाहतुकीत ३३.५ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी (१ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२२) ३०.३२ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. यावर्षी हे उत्पन्न ४६.११ कोटी आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेची वाहन वाहतुकीमध्ये उत्कृष्ट कामगिरी आहे. मुंबई, सोलापूर आणि नागपूर विभागांनी आतापर्यंत पुणे आणि भुसावळ विभागांच्या तुलनेत कमी वाहतूक केली आहे. परंतु पुणे विभाग ऑगस्ट-२०२३ नंतर वाहतूक वाढवेल अशी अपेक्षा आहे. -शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.