बुलढाणा : जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील आकस्मिक केस गळती आणि टक्कल या आजारावरील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा (आयसीएमआर) चा अहवाल लवकरच हाती येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती केंद्रीय आरोग्य, आयुष, कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.

बाधित गावातील सर्व नमुन्यांची शास्त्रीय पद्धतीने तपासणी, त्यावर संशोधन करुनच हा अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे सांगून प्रसंगी परिषद आणि वैद्यकीय संशोधक पदमश्री डॉक्टर हिम्मतरावं बावस्कर यांच्याशी चर्चा सुद्धा होऊ शकते, असे सुतोवाच देखील मंत्र्यांनी केले.

आज बुधवारी जाधव हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी बुलढाणा येथील शासकीय विश्राम भवनात प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी जाधव म्हणाले, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (दिल्ली व चेन्नई) यांची विशिष्ट कार्य पद्धती आहे. सर्व बाजूंनी विचार, संशोधन करुन परिषद आपला अहवाल सादर करते. ती काही खासगी कंपनी नसल्याचे सांगून परिषदेचा अहवाल हा अंतिम प्रमाण असतो, त्यामुळे त्यासाठी अनाठायी घाई करणे योग्य नसल्याचे सांगून लवकरच हा अहवाल सादर करण्यात येईल.

आयसीएमआरच्या दिल्ली आणि चेन्नई येथील शाश्त्रज्ञ, संशोधक चमुंनी शेगाव तालुक्यातील केस गळती बाधित बहुतांश गावांना भेटी देऊन टक्कलग्रस्त रुग्णाशी संवाद साधला, त्यांची तपासणी केली. गावातील धान्य, पाणी, त्वचा, केस आदिचे नमुने संकलित केले.

डॉक्टर बावस्कर यांनी रेशनच्या गव्हामध्ये सेलिनियमचे प्रमाण जास्त असल्याने हा आजार झाल्याचे सांगितले. मात्र, आयसीएमआर चमुने गव्हाचे तीन नमुने घेतले होते. तपासणीत एका नमुन्यात सेलिनियमचे जास्त तर दुसऱ्यात कमी प्रमाण आढळले. तिसऱ्या नमुन्यात सेलिनियम आढळलेच नाही. त्यामुळे केवळ गव्हामुळे केस गळती झाली असे सांगता येणार आहे असे ते म्हणाले.

बाधित गावांना जिथून गहू पुरवठा झाला तिथूनच (त्याच गोदामातून) जिल्ह्यातील सर्व गावांना रेशन गव्हाचा पुरवठा होतो. मग सर्वत्र हा आजार झाला असता, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. यामुळे केवळ गव्हामुळे हा आजार झाला असे म्हणणे योग्य नसल्याचे मंत्री म्हणाले. विस्तृत संशोधन करुन परिषद आपला अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल लवकरच हाती येणे अपेक्षित अशल्याचे जाधव यावेळी म्हणाले.

यापूर्वी परिषदेने आपल्या प्राथमिक अहवालात रुग्णाच्या शरीरात सेलिनियमचे प्रमाण जास्त असल्याने हा आजार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. मात्र, लवकरच हाती येणाऱ्या अहवालातून आजाराचे नेमके कारण, निदान सांगता येणार आहे. हिम्मतराव बावस्कर यांच्या अहवालावर फारसे बोलण्याचे टाळून प्रसंगी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि त्यांची चर्चा घडवून आणू असे मंत्री म्हणाले. आयुष मंत्रालयतर्फे
नुकतेच देशात राबविण्यात आलेले देश का प्रकृती परीक्षण हे अभियान विक्रमी ठरले आहे. या विक्रमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. या अभियानात पाच विक्रमाची नोंद झाली असून तसे प्रमाणपत्र ‘गिनीज बुक’तर्फे मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात आयुष मंत्रालयाला देण्यात आली, अशी माहितीही मंत्र्यांनी दिली.

संशयाला वाव

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर बुधवारी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज ‘संशयाला वाव आहे’ असे सूचक विधान केले. ते म्हणाले, ज्यांचा शिवसेनेशी अजिबात संबंध नाही, जे हिंदुत्वशी निगडित नाही अशा काहींना विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे ‘नीलम गोऱ्हे यांच्या आरोपात संशय घ्यायला वाव आहे’. हिंदुत्वाच्या गप्पा करणाऱ्या अनेक नेत्यांनी महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान टाळले. असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना लगावला.

Story img Loader