नागपूर : सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्राला लागून असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ६० हेक्टर वनक्षेत्र बॉक्साईट खाणीसाठी वापरण्यास केंद्रीय वन्यजीव मंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. आणखी पाच खाणी या परिसरात प्रस्तावित आहेत. वाघांसह इतरही वन्यप्राण्यांचा हा भ्रमणमार्ग असल्याने खाणीमुळे त्याचे विखंडन होईल, अशी भीती वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
शाहूवाडी तालुक्यातील पठार (सडा) पट्टय़ातील या राखीव वनक्षेत्राचे खाणकामासाठी रूपांतर करण्यास मंडळाने हिरवा कंदील दिला आहे. खाण क्षेत्र पश्चिम घाट (सह्याद्री) पर्यावरणीय क्षेत्र आणि व्याघ्र प्रकल्पाच्या बाजूने स्थित आहे. ‘विशाळगड आणि पन्हाळगड संवर्धन राखीव’ पासून काही किलोमीटर अंतरावर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राधानगरी वन्यजीव अभयारण्याशी राखीव वनांनी आणि नव्याने घोषित केलेल्या संवर्धन राखीव जागांद्वारे जोडलेले आहे. या व्याघ्रप्रकल्पात वाघ निवासी नाही, पण या भ्रमणमार्गाचा वापर करून वाघ सातत्याने येत असतात. मात्र, याच कॉरिडॉरमध्ये बॉक्साईट खाणीच्या प्रस्तावांना तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे.
खाणींना आधीच २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यातील वनमंजुरी मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. या वनजमिनी जैवविविधतेला आधार देणाऱ्या असून घनदाट जंगलांनी वेढल्या आहेत. या ठिकाणी इतर प्रजातींमध्ये रानगवे, बिबट यांसारखे अधिसूची एकमधील वन्यप्राणी आहेत. येथे चांगले जलसाठे आहेत. या खडकाळ पठारी भागातून झिरपणारे सर्व गोडे पाणी खेडय़ांतील पाण्याच्या पातळीत भर घालते आणि पिके वाढण्यास मदत करते. बॉक्साईटच्या उत्खननामुळे हे स्रोत आणि प्रवाह गंभीरपणे प्रदूषित होतील. या वायू आणि जलप्रदूषणाचे परिणाम अनेक दशके टिकतील. राधानगरी वन्यजीव अभयारण्याशी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडणारी वाघाची वाट अस्तित्वात आहे. राधानगरी ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा हा कॉरिडॉर वाघांच्या उत्तरेकडील स्थलांतरासाठी महत्त्वाचा आहे. शिवाय या गावांचा समावेश ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा’ने नोंदवलेल्या ‘चांदोली-राधानगरी-गोवा’ व्याघ्र भ्रमणमार्गातही करण्यात आला आहे. या बायपासच्या परिसरात खनन सुरू राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
वन्यजीव अधिवास असलेली वनजमीन पश्चिम घाटातील जंगलेतर क्रियाकलापांसाठी वळवली जाऊ नये. पश्चिम घाट हे युनेस्कोचे नैसर्गिक वारसा स्थळ आणि जागतिक जैवविविधतेचे केंद्र आहे. याव्यतिरिक्त या ‘लँडस्केप’चा काही भाग विशाळगड संवर्धन राखीव आणि पन्हाळगड संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्याचे अलीकडील प्रयत्न लक्षणीय आहेत. राज्य वन्यजीव मंडळाने नुकतेच मंजूर केलेले मसाई पाथर संवर्धन राखीव हे प्रस्तावित खाण लीजच्या पूर्वेला त्याच डोंगरसाखळीवर आहे. या अधिवासांचे विखुरलेले स्वरूप पाहता, या अतिरिक्त वनजमिनी खाणकामासाठी वळवण्याऐवजी या संवर्धन राखीव जागेत जोडल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी राज्याच्या वन खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले आहे. – रोहन भाटे शाह, मानद वन्यजीव रक्षक, सातारा.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या लँडस्केपमध्ये वाघ आणि इतर मोठय़ा मांसाहारी प्राण्यांच्या वसाहतीसाठी कॉरिडॉर (भ्रमणमार्ग) अत्यंत महत्त्वाचा आहे. या भ्रमणमार्गामुळेच उत्तरेकडे वाघांची हालचाल दिसून येते. या अरुंद कॉरिडॉरचे तुकडे करून तेथे खाणीसाठी जंगलाच्या जमिनीवर कोणत्याही स्थितीत परवानगी दिली जाऊ नये. बॉक्साईट खाण ही पश्चिम घाटातील सर्वात विनाशकारी क्रिया आहे. – गिरीश पंजाबी, संवर्धन जीवशास्त्रज्ञ