देशातील पहिले केंद्र, टाटा ट्रस्टसोबत करार; राज्यात नागपूर, चंद्रपुरात आदर्श मॉडेल निर्माण करणार
राज्याच्या सामाजिक विकासाच्या निर्देशांकासह प्रशासनात विशेष सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्यात गुरुवारी विविध सामंजस्य करार करण्यात आले असून त्यात नागपुरातील मनोरुग्णालयात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ विकसित करण्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाचे आदर्श मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी राज्यातील दोन जिल्ह्य़ांची निवड करण्यात आली असून त्यातही नागपूर व चंद्रपूर जिल्ह्य़ांचा समावेश आहे.
मनोरुग्णालयात विकसित करण्यात येणारे केंद्र हे तशा स्वरूपाचे देशातील पहिले केंद्र असणार असून नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्य़ात राबविण्यात येणारे मॉडेल टप्प्याटप्प्याने राज्याच्या इतर भागात राबविण्यात येणार आहे. राज्याच्या सामाजिक विकासाच्या निर्देशांकासह प्रशासनात विशेष सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्यात गुरुवारी विविध सामंजस्य करार करण्यात आले. यात आरोग्य सेवा, वैद्यकीय महाविद्यालयांव्दारे सेवा, जिल्हा नियोजन व सांख्यिकी व्यवस्थापन, पोषक आहाराचा पुरवठा, शिक्षणातील गुणवत्ता वाढ, डिजिटल प्रशिक्षणामार्फत महिला सक्षमीकरण, कारागृह प्रशिक्षणात सुधारणा आदी बाबींचा समावेश आहे. मानसिक आरोग्य ही महत्त्वाची समस्या असल्याने त्यासाठी नागपूर येथील मनोरुग्णालयात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ विकसित करण्यात येणार आहे. हे केंद्र अशा स्वरूपातील देशातील पहिले केंद्र असणार असून राज्यासह देशात मॉडेल म्हणून वापरण्यात येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी टाटा ट्रस्टसोबत महाराष्ट्र शासनाने करार केला आहे.
सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागांना तांत्रिक सहाय्य करण्यासाठी ‘स्ट्रॅटेजिक हेल्थ केअर अॅडवायझरी युनिट’ स्थापन करण्यात येणार असून त्यामार्फत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सरकारचा मानस
सांख्यिकीवर आधारित जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी पहिल्या टप्प्यात नागपूर व चंद्रपूर या दोन जिल्ह्य़ात कार्यक्रम राबवून प्रशासनाचे आदर्श मॉडेल निर्माण करण्यात येणार आहे. नंतरच्या टप्प्यात हेच मॉडेल संपूर्ण राज्यात राबविण्याचा सरकारचा मानस आहे. विविध क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या सुविधा टाटा ट्रस्टमार्फत विनामूल्य पुरविण्यात येणार असून याबाबत शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा ट्रस्टचे आभार मानले आहे.