लोकसत्ता टीम
वर्धा: दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित राहणार असून यावर्षी प्रसिद्ध उद्योजक सत्यनारायण नुवाल यांना ‘डी.लिट’ पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.
या अभिमत विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारोह उद्या, शनिवारी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारोहाला केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना पदवी व पुरस्कार प्रदान करतील. या समारोहात सोलर इंडस्ट्रीज इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सत्यनारायण नुवाल या विदर्भ भूमिपुत्रास डी.लिट म्हणजेच डॉक्टर ऑफ लिटरेचर या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डाॅ. वेदप्रकाश मिश्रा यांनी दिली.
दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेला २४ मे २००५ रोजी अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आणि या विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारोह १६ जानेवारी २०१० रोजी पार पडला. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था आज दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था या नव्या नामाभिधानाने कार्यरत असून अभिमत विद्यापीठाची अखंडता कायम ठेवत १४ वा दीक्षांत समारोह सावंगी मेघे येथील शैक्षणिक परिसरात साजरा होतो आहे. या विद्यापीठात सध्या १८ देशातील १३३ विद्यार्थी शिक्षण घेत असून या विदेशी व अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांपैकी ७० विद्यार्थीसुद्धा पदवी प्राप्त करणार आहेत.
हेही वाचा… बुलढाणा: अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आता ग्रामपंचायत स्तरावरही, दोन महिलांचा करणार सन्मान
या समारोहात वैद्यकीय शाखेतील १९८ स्नातक व १२५ स्नातकोत्तर, दंतविज्ञान शाखेतील १०१ स्नातक व २९ स्नातकोत्तर, आयुर्वेद शाखेतील ६८ स्नातक व १९ स्नातकोत्तर, भौतिकोपचार शाखेतील ५४ स्नातक व १५ स्नातकोत्तर, नर्सिंग शाखेतील १२६ स्नातक व १३ स्नातकोत्तर, औषधी निर्माणशास्त्र शाखेतील ३३ स्नातक विद्यार्थी तसेच परावैद्यकीय शाखा व अन्य विद्याशाखेतील ९१३ विद्यार्थ्यांना आरोग्यसेवेची दीक्षा देण्यात येईल. याशिवाय, २४ पीएचडीप्राप्त आणि ३६ फेलोशिपप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असून विविध शाखेच्या परीक्षांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, असे कुलगुरू डॉ. ललित वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा… चंद्रपूर : सासऱ्याची चाकू भोसकून हत्या करणाऱ्या जावयास आजन्म करावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
पत्रपरिषदेला संस्थेचे प्रशासकीय महासंचालक डॉ. राजीव बोरले, प्र-कुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसुळकर, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांची उपस्थिती होती. दीक्षांत समारंभापूर्वी ना. कराड आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, कर्करोग रुग्णालय तसेच सुपर स्पेशालिटी सेंटरला भेट देणार असून यावेळी त्यांच्या हस्ते माता बाल संगोपन बससेवेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील नवनिर्मित अधिष्ठाता कार्यालय तसेच अनुकृती व जिज्ञासा संग्रहालयाचे ना. कराड उद्घाटन करणार आहेत.
हेही वाचा… बुलढाणा : राज्यात संत विद्यापीठ स्थापन करणार : मुख्यमंत्री
विद्यापीठ सभागृहात आयोजित दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षस्थानी कुलपती दत्ता मेघे राहणार असून मंचावर विशेष अतिथी ना. डॉ. भागवत कराड यांच्यासह प्रकुलपती डाॅ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, प्र-कुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, आमदार समीर मेघे, कराड येथील कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, व्यवस्थापन मंडळ सदस्य अनिल पारेख, अशोक चांडक, डाॅ. अभ्युदय मेघे, डॉ. राजीव बोरले, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. अनुप मरार, डाॅ. मीनल चौधरी, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसुळकर, रवि मेघे, डॉ. तृप्ती वाघमारे, मनीष वैद्य, डॉ. एस. एस. पटेल, डॉ. अमित गुडधे, अधिष्ठाता डाॅ. सुनीता वाघ, डॉ. विद्या लोहे, डॉ. जहीर काझी, डॉ. प्रियांका जयस्वाल, डाॅ. के.टी.व्ही. रेड्डी, डाॅ. राजू गणेश सुंदर, ब्रजेश लोहिया, डॉ. चित्र ढवळे, डॉ. पल्लवी डायगव्हाणे, डॉ. शुभदा गाडे, डॉ. दीपक खोब्रागडे, डॉ. अनिता वंजारी, डॉ. जया गवई, डॉ. इर्शाद कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती राहील.