नागपूर : पुणे, मुंबई आणि औरंगाबादच्या तुलनेत नागपुरात वाड्:मयीन वातावरण का नाही, यावर खरे तर संशोधन व्हायला हवे. एरवी पुण्यात हा कार्यक्रम सकाळी सहा वाजता असता तरीही संपूर्ण सभागृह खचाखच भरलेले दिसून आले असते. पाचशेच्या आसपास रसिक बसू शकतील एवढे हे सभागृह, पण ते अर्धेही भरलेले असू नये? एवढा मोठा सोहोळा आणि एवढी तोकडी उपस्थिती, असा प्रश्न ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी उपस्थित केला.
विदर्भ साहित्य संघाचा शतकमहोत्सवी सोहळा व वाङ्मय पुरस्कार वितरण सोहोळा शनिवारी नागपुरात पार पडला. यावेळी ते बोलत होते. एलकुंचवार म्हणाले, शतक महोत्सवी सोहोळ्याला इतके कमी लोक, अपेक्षित नाहीत. विदर्भ साहित्य संघाने हे मनावर घ्यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विदर्भातल्या लोकांना प्राधान्य नाही, असेच रडगाणे नेहमी गायले जाते, पण मला तरी हे आजवर पटलेले नाही. कारण इथल्या साहित्यिकांनी जग गाजवले आहे, असेही एलकुंचवार म्हणाले. मराठी साहित्य आणि कवितांचे कार्यक्रमच होणार नसतील तर लोकांना मराठीची गोडी लागणार कशी, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याच कार्यक्रमात उपस्थित केला.