नागपूर : जालन्यातील लाठीमारामुळे पुन्हा चर्चेत आलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ाने आता मराठा-कुणबी असे नवे वळण घेतले आहे. कृषिक्रांतीचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ७० वर्षांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विदर्भातील मराठय़ांनी कुठे कुणबी मराठा तर कुठे मराठा कुणबी अशा पद्धतीने जातीची नोंद केली. त्या बळावर त्यांना ओबीसी प्रवर्ग मिळाला. मराठे हेच कुणबी असल्याचे डॉ. देशमुख यांचे तेव्हा म्हणणे होते. आता याचाच आधार घेत इतर प्रदेशातूनसुद्धा ही मागणी समोर आल्याचे जालन्याच्या घटनेतून दिसून आले.
त्यामुळे मूळ आरक्षणाचा मुद्दा बाजूला राहिला व हा नवाच वाद निर्माण झाला आहे. अशी जात नोंद असलेल्यांना ओबीसी प्रवर्गाची प्रमाणपत्रे देण्यास विदर्भातील संघटनांनी विरोध केला आहे.उल्लेखनीय म्हणजे, या प्रवर्गात अनेक जाती आहेत. त्यातील कुणबी या एकाच जातीत मराठय़ांना समावेश हवा असल्याने इतर जातींमध्ये अस्वस्थता आहे. मराठा कुणबी अशी जातीची नोंद असलेल्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासनाने २००४ ला एक आदेश जारी केला होता. त्याचा आधार घेत विदर्भात अशी प्रमाणपत्रे अनेकांनी मिळवली.