अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेड खरीप व रब्बी हंगामात हरभरा खरेदीसाठी तक्रारदारांनी हमालांचा पुरवठा केल्यानंतर त्याचे ९.४६ लाखाचे  देयक काढण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या सभापती, उपसभापती या दोघांना सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> देऊळगाव राजा तहसीलदारांची तत्काळ बदली करा, विभागीय आयुक्तांचा शासनाकडे प्रस्ताव; तहसीलदारासह ७ कर्मचाऱ्यांच्या…

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी एका कंत्राटदाराने हमालांचा पुरवठा केला होता. त्याचे १४ लाख ३९ हजार ५९२ रुपयांचे देयक सचिव सुरेश सोनोने यांच्याकडे सादर केले. त्यानंतर काही दिवसांनी कंत्राटदाराचे चार लाख ९३ हजार रुपयांची रक्कम धनादेश व रोख स्वरुपात अदा करण्यात आली. नऊ लाख ४६ हजार ५९२ रुपयांच्या देयकाची रक्कम थकीत असल्याने त्यांनी पुन्हा अर्ज करून मागणी केली. त्यावर सभापती सुनील मोतीराम इंगळे (४९), उपसभापती प्रदीप मधुकर ढोले (६२) व सचिव सुरेश सोनोने या तिघांनी  एक लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार अकोला एसीबीकडे करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शैलेष सपकाळ व पथकाने केलेल्या पडताळणीमध्ये उपसभापतीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले, तर सभापती इंगळे याने त्यास प्रोत्साहन दिल्याचेही समोर आले. त्यानंतर आज एक लाख रुपयांची लाच स्वीकारताच सभापती सुनील इंगळे व उपसभापती प्रदीप ढोले या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याविरुध्द तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chairman deputy chairman of market committee arrest by acb while accepting bribe ppd 88 zws