वाघाने शिकारच केली पाहिजे, शिकार विसरेल तो वाघ कसला? शिकार विसरून वाघ गवत खायला लागला तर अनेक प्रश्न उभे राहतात. वाघाच्या दुबळेपणाची चर्चा सुरू होते. अशीच चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू झाली आहे. या चर्चेचे स्थळ जंगल नाही, तर साहित्य वर्तुळ आहे. मराठीतील नामवंत कवी, लेखक, पटकथाकार प्रा. विठ्ठल वाघ सध्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला गवसणी घालायला निघाले आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे, तर या पदाची शिकार करायला निघाले आहेत. मात्र, ती करताना त्यांनी जो पवित्रा घेतला आहे तो काहींना बुचकाळ्यात टाकणारा, तर काहींच्या मनात प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे.
राज्यातील शेतकरी सध्या संकटात आहेत. या बळीराजाचे दु:ख हाच सर्वत्र चर्चिला जाणारा विषय आहे. याच शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी मला निवडून द्या, अशी साद या साहित्यातल्या वाघाने जाणत्या मतदारांना घातली आहे. ही सादच अनेक प्रश्न निर्माण करणारी व वाघ साहित्यिकापेक्षा राजकारणी जास्त आहेत, हे सांगणारी आहे. शेतकऱ्यांच्या दु:खाचे भांडवल करून सत्ता मिळवणे हा प्रकार आता राजकारणात स्थिर झाला आहे. विरोधात असताना या दु:खाला कुरवळायचे आणि सत्ता मिळताच विसरायचे, हा प्रघातच पडून गेला आहे. राजकारणात यश मिळवण्यासाठी असे भांडवल करणे काही नवे नाही. आजवर इतरांची दु:खे कुरवाळणारे राजकारणी आता शेतकऱ्यांच्या दु:खाने व्यथित झाल्याचे दाखवत आहेत, इतकेच! इतका हा सरळ व्यवहार आहे. मात्र, आता साहित्य वर्तुळाने राजकारण्यांच्या मार्गाने जावे हे अतीच झाले! विठ्ठल वाघांची कविता मातीशी इमान जपणारी आहे. त्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या गेलेल्या आहेत, हे अगदी खरे! मात्र, समाजाने त्यांना केवळ ते शेतकऱ्यांवर लिहितात म्हणून स्वीकारलेले नाही. शेतकऱ्यांच्या दु:खावर अनेकजण लिहितात म्हणून ते सर्वच मोठे झाले, असेही नाही. वाघांची कविता, त्यांचे लेखन दर्जेदार आहे म्हणून समाजाने त्यांना स्वीकारले. ज्यांनी स्वीकारले त्यात केवळ शेतकरीच आहेत, असेही नाही. समाजातील सर्वच स्तरातले लोक वाघांचे चाहते आहेत. या सर्वानी वाघांना मोठेपण बहाल केले ते त्यांची साहित्यसेवा बघून. असे असताना आता वाघांनी कूळ शोधण्याचा प्रकार करावा, हे त्यांना शोभणारे नाही. शेतकऱ्यांच्या दु:खाचा हवाला दिला तर साहित्यप्रांतात पसरलेले मतदार हळवे होऊन त्यांनाच मतदान करतील, अशी अपेक्षा वाघ ठेवून आहेत काय? आणि ज्यांनी मतदान केले नाही त्यांना शेतकऱ्यांच्या दु:खाशी काही देणेघेणे नाही, असा अर्थ वाघ काढतील काय? किमान साहित्याच्या प्रांतात तरी असे दु:खाचे भांडवल करून मते मागणे योग्य आहे का?, असे अनेक प्रश्न या भूमिकेतून उभे ठाकले आहेत.
आज अध्यक्षपदासाठी जे उमेदवार रिंगणात आहेत त्यात वाघांचे स्थान नि:संशय वरचे आहे. असे असताना त्यांनी प्रचारात ही राजकीय चतुराई दाखवण्याची काहीच गरज नव्हती. हा प्रकार न्याय मिळवण्यासाठी अथवा अन्याय का झाला, हे सांगण्यासाठी जातीचे कारण समोर करण्यासारखा आहे. मुळात विठ्ठल वाघ हे दिलदार व्यक्तिमत्व आहे. खरे सांगायचे, तर साहित्यप्रांतात ते आजवर ‘वाघासारखेच’ वावरलेले आहेत. तरीही त्यांना साहित्यातील सन्मानासाठी शेतकऱ्यांच्या दु:खाचा आधार घ्यावासा वाटावा, हे पटणारे नाही. वाघांनी केवळ कविताच लिहिल्या, असे नाही. साहित्याची सेवा करतानाच या माणसाने काही काळ शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे ओझेसुध्दा खांद्यावर वाहून नेले. अनेक वष्रे ते या आंदोलनात सक्रीय कार्यकर्ता म्हणून वावरले. न्याय मागण्यासाठी शेतकऱ्यांना जागे करण्यात त्यांच्या कवितांचा वाटा राहिला आहे. गेल्या पंधरा वर्षांंपासून ते पुण्यात वास्तव्याला गेल्याने या सर्वापासून दूर होते. याच काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. त्यांच्या दु:खाची तीव्रता सर्वत्र चर्चेचा विषय ठरू लागली. यावरून सारा समाज चिंतित असताना वाघ सक्रीय झाल्याचे कुठे दिसले नाही. आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरताच त्यांना हे आठवावे व त्यातून त्यांनी सक्रीय व्हावे, हे पचनी पडणारे नाही. नाना पाटेकर शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला, त्याला प्रसिध्दी मिळू लागली, हे लक्षात येताच वाघांनी भेटीसाठी नानाचे घर गाठावे व त्याची छायाचित्रे समाजमाध्यमात फिरतील, अशी व्यवस्था करावी, हे या महान कवीला शोभून दिसणारे नाही. मराठी साहित्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना फारसे स्थान नाही, त्यावर फार कमी लिखाण झाले आहे, असे वाघ म्हणतात. हे खरे असले तरी पूर्णाशाने नाही. आजवर कमी का होइना पण जे लेखन झाले ते दर्जेदार नव्हतेच, असे वाघांना सुचवायचे आहे का? सदानंद देशमुखांची ‘बारोमास’ ही कादंबरी दर्जेदार होती व आहेच. समजा उद्या वाघ अध्यक्ष झालेच तर या प्रश्नावरील लेखनाला बहर येईल, असे समजायचे का? यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला मदत होईल का?, यासारखे अनेक प्रश्न या प्रचारातून निर्माण होतात. कर्ज, नापिकी, दुष्काळ यामुळे आत्महत्येच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्याला दुबळे ठरवण्याचा प्रयत्न अनेकांकडून होत आहे. त्याच्या दु:खाची सांगड दुबळेपणाशी जोडली जात आहे. वाघही हा मुद्दा समोर करून दुबळे का होत आहेत, हा खरा प्रश्न आहे. वाघांची साहित्यसेवा या दु:खाचा आधार घेण्याएवढी दुबळी कधीच नव्हती. त्यामुळे आतातरी वाघाने ‘वाघासारखे’ वागावे, असे सुचवायला काय हरकत आहे?
– देवेंद्र गावंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा